थोडक्यात बातम्या रायगड
दसरा खरेदीचा पोयनाड बाजारपेठेत उत्साह
पोयनाड (बातमीदार) : हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा खरेदीचा उत्साह बुधवारी दिसून आला. सकाळपासूनच नागरिकांनी झेंडूची फुले, हार, फळे, आपट्याची पाने खरेदीसाठी गर्दी केली होती. विजयादशमीला सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवींचे विसर्जन होणार असून, त्याचीदेखील तयारी व त्यासाठी लागणारे सामान याची पोयनाड परिसरात पूर्ण झाली आहे. यंदा सोन्याच्या दराने एक लाख १० हजाराचा टप्पा पार केला असला तरी पोयनाड बाजारपेठेत मात्र ग्राहकांचा सोने खरेदीसाठी उत्साह असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दसऱ्या झेंडूच्या फुलाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पोयनाड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा झेंडू फुलांच्या घेण्यासाठी ग्राहकांनी विक्रेत्यांकडे मोठी गर्दी केली होती.
...............
कर्जतचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांचा भाजपमध्ये प्रवेश
कर्जत (बातमीदार) ः कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांनी आज (ता. १) पनवेल येथील जिल्हा भाजप कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भालचंद्र जोशी हे २००९ ते २०१४ दरम्यान मनसेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना कर्जत शहरप्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळली होती. काही काळ राजकीय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश लाड, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत, माजी चिटणीस रमेश मुंढे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नेरळ शहर महिला अध्यक्ष नम्रता कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. भालचंद्र जोशी हे सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असून, कर्जतमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सर्व शाखीय ब्राह्मण सभा आणि विविध संस्थांमध्ये ते सक्रिय आहेत. मागील कर्जत नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला होता. भालचंद्र जोशी यांच्या प्रवेशामुळे भाजपला कर्जत शहरात संघटनात्मक बळ मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
.....................
रायगडची सुकन्या रोशनी पारधी हिची क्रिकेट संघात निवड
पोयनाड (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील महाडची सुकन्या रोशनी पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ गटातील महिलांच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. अष्टपैलू क्रिकेट खेळाडू असलेली रोशनी पारधी ही महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट संघात निवड झालेली रायगडच्या क्रिकेट इतिहासातील पहिली महिला खेळाडू आहे. मागील वर्षी आंतरजिल्हा १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत रोशनी पारधी हिने लागोपाठ तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रोशनी ही जलदगती गोलंदाज व सलामीवीर फलंदाज म्हणून तिने सातत्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन आरडीसीएच्या संघासाठी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या कनिष्ठ वयोगटाच्या संघात खेळतांना रोशनी हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या अष्टपैलू क्रिकेट खेळाच्या जोरावर रोशनी हिने आजवर आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अनेक शतके ठोकली व अनेक फलंदाज बाद केले आहेत. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी रोशनी, तिचे पालक आणि प्रशिक्षक आवेश चिचकर यांचे अभिनंदन केले आहे. रोशनी हिने कमी वयात उतुंग भरारी घेत रायगडचे नाव खऱ्या अर्थाने रोशन केले आहे. रायगड जिल्ह्यात मुलांच्या बरोबरीने मुलींमध्येसुद्धा चांगल्या दर्जाची गुणवत्ता आहे, त्यांना योग्य संधी, प्रशिक्षण व त्यांना त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ आरडीसीएच्या माध्यमातून आपण उपल्ब्ध करून देणार असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. भविष्यात रोशनी पारधी हिने आपल्या भारत देशासाठी खेळावे अशी इच्छा सर्वांची आहे. त्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तिला लागेल ती मदत करण्यात येणार असल्याचे या वेळी आरडीसीएच्या वतीने जाहीर करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.