थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

दसरा खरेदीचा पोयनाड बाजारपेठेत उत्साह
पोयनाड (बातमीदार) : हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा खरेदीचा उत्साह बुधवारी दिसून आला. सकाळपासूनच नागरिकांनी झेंडूची फुले, हार, फळे, आपट्याची पाने खरेदीसाठी गर्दी केली होती. विजयादशमीला सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवींचे विसर्जन होणार असून, त्याचीदेखील तयारी व त्यासाठी लागणारे सामान याची पोयनाड परिसरात पूर्ण झाली आहे. यंदा सोन्याच्या दराने एक लाख १० हजाराचा टप्पा पार केला असला तरी पोयनाड बाजारपेठेत मात्र ग्राहकांचा सोने खरेदीसाठी उत्साह असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दसऱ्या झेंडूच्या फुलाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पोयनाड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा झेंडू फुलांच्या घेण्यासाठी ग्राहकांनी विक्रेत्यांकडे मोठी गर्दी केली होती.
...............
कर्जतचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांचा भाजपमध्ये प्रवेश
कर्जत (बातमीदार) ः कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांनी आज (ता. १) पनवेल येथील जिल्हा भाजप कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भालचंद्र जोशी हे २००९ ते २०१४ दरम्यान मनसेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना कर्जत शहरप्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळली होती. काही काळ राजकीय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश लाड, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत, माजी चिटणीस रमेश मुंढे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नेरळ शहर महिला अध्यक्ष नम्रता कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. भालचंद्र जोशी हे सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असून, कर्जतमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सर्व शाखीय ब्राह्मण सभा आणि विविध संस्थांमध्ये ते सक्रिय आहेत. मागील कर्जत नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला होता. भालचंद्र जोशी यांच्या प्रवेशामुळे भाजपला कर्जत शहरात संघटनात्मक बळ मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
.....................

Marathi News Esakal
www.esakal.com