सामाजिक कार्यात ठसा उमटवणाऱ्या शिक्षिका

सामाजिक कार्यात ठसा उमटवणाऱ्या शिक्षिका

Published on

सामाजिक कार्यात ठसा उमटवणाऱ्या शिक्षिका
विमल गायकवाड यांचे प्रेरणादायी योगदान
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः शिक्षक ही केवळ ज्ञानदान करणारी भूमिका नसून, ती समाजाला दिशा देणारी शक्तीदेखील असते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे विमल गायकवाड या परळ येथील शिक्षिका होत. त्यांनी शिक्षणासोबतच समाजसेवेचे व्रत अंगीकारले आणि गेली दोन दशके समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे कार्य केले आहे.
शालेय जीवनातच समाजकारणाची गोडी लागली. समाजातील दुर्बल घटकांना न्याय, सन्मान व स्वावलंबन मिळावे, यासाठी त्यांनी २००० साली ‘आयुष्य सोशल फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. जात, धर्म, वंश न पाहता त्यांनी एकच ध्येय समोर ठेवले. माणुसकीच्या आधारावर समाजसेवेचे व्रत स्वीकारून अनेकांना मदतीचा हात दिला.
त्यांच्या संस्थेमार्फत महिला, बालक, किशोरवयीन मुले-मुली, एड्सग्रस्त, ट्रान्सजेंडर, स्थलांतरित महिला व गरीब कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण जनजागृती, महिला सक्षमीकरण, बालहक्क संरक्षण हे त्यांच्या कार्याचे मुख्य विषय आहेत.
एचआयव्ही एड्स या संवेदनशील विषयावर जनजागृती, कार्यशाळा, पथनाट्य, समुपदेशन यामार्फत समाजाची मानसिकता बदलण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. रेड व्हिव्ह्स ह्युमन राइट्स संस्थेच्या माध्यमातून एड्सग्रस्त महिलांसाठी आधार तयार केला आहे. तीन हजारांपेक्षा अधिक महिलांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.
गरजू, विधवा, वंचित महिला व अल्पसंख्याक गटातील महिलांसाठी घरगुती व्यवसाय प्रशिक्षण, स्वयंरोजगार गटांची निर्मिती (२० गट), अन्न प्रक्रिया व उत्पादन प्रशिक्षण इत्यादींसाठी कार्यशाळा राबवून त्यांना स्वावलंबी बनवले असून, अनेकांच्या जीवनात मोठे बदल झाले असल्याचे त्या सांगतात.

शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग
विमल गायकवाड यांनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी भरून देणे, वाचनालय चालवणे, करिअर मार्गदर्शन अशा विविध मार्गांनी मदत केली. १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी खास मार्गदर्शन करण्यात आले.

कोविड काळातील उल्लेखनीय कार्य
कोविड महामारीच्या कठीण काळात विमल गायकवाड यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर, स्थलांतरित कामगार व अडकलेल्या महिलांना कोरडे अन्नधान्य, सॅनिटायझर, मास्कचे वितरण केले. या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सन्मानपत्र व गौरव प्राप्त झाला.

इतर महत्त्वपूर्ण उपक्रम
‘लोकफेस्टिव्हल’ आणि ‘आयुष्य सोशल फाउंडेशन फेस्टिव्हल’मार्फत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. ‘दिशा’ कॅन्सर रुग्णांसाठी कार्य करणारी संस्था यांना अन्नधान्य देण्यात आले. मुंबईतील व मुलुंडमधील गरीब विद्यार्थ्यांना हेल्थकिट्स व शैक्षणिक साहित्य दिले जाते. दरवर्षी किमान पाच विद्यार्थ्यांची फी संस्था स्वतः भरत असल्याची माहिती त्यांनी दिली.

एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
विमल गायकवाड यांचे कार्य केवळ समाजसेवेपुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या प्रयत्नांतून न्याय, समानता व आत्मसन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार समाजातील दुर्बल घटकांना मिळाला आहे. शिक्षिकेच्या भूमिकेपलीकडे जात त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण प्रस्थापित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com