उरणकरांच्या आरोग्याशी खेळ
उरणकरांच्या आरोग्याशी खेळ
सीआरझेडच्या परवानगीअभावी रुग्णालय रखडले
उरण, ता. २ (वार्ताहर)ः शहरातील शंभर खाटांच्या रुग्णालयाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. ८४ कोटींच्या निधीतून रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे, पण सीआरझेड विभागाची परवानगी नसल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने उरणकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
उरणकरांना सुसज्ज रुग्णालय मिळावे, यासाठी माजी आमदार विवेक पाटील, माजी आमदार मनोहर भोईर यांनी पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने २०११ मध्ये उरण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून उरण-पनवेल मार्गावरील वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहती शेजारी भूखंड मंजूर करण्यात आला, तर ५७ कोटींचा निधीही मंजूर झाला होता, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे रुग्णालय रखडलेले आहे. अशातच आता सिडकोने दिलेला भूखंड सीआरझेडमध्ये येत असल्याने आराखडा बदलण्यात आला आहे.
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी मंजूर असून, ठेकेदार नेमण्यात आले आहेत. परवानगी मिळाल्यानंतर तातडीने कामाला सुरुवात केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी सांगितले.
-------------------------------------
अशी असणार रचना
- नवीन आराखड्यानुसार बोकडविरा येथील भूखंडावर तळमजल्यासह चार मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये १०० खाटांचे रुग्णालय असणार आहे. ५५ कोटी ४४ लाखांची निविदा सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रसिद्ध केली आहे.
- इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या भूखंडावर कर्मचाऱ्यांसाठी तीन इमारती आहेत. टी-१ मध्ये १० निवासी खोल्या, टी-२ मध्ये २८ निवासी खोल्या आणि टी-३ मध्ये नऊ निवासी खोल्या आणि एक अधिकाऱ्यासाठी निवास असणार आहे.
--------------------------------------
उपचारांअभावी रुग्ण दगावले
- उरण तालुक्याचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. उरण जेएनपीए पोर्टच्या अनुषंगाने परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. जवळपास नऊशेच्या आसपास नागरिकांनी जीव गमावला आहे. त्यापैकी अनेक अपघात वेळेवर उपचार मिळाले नसल्याने मृत्यू झाले आहेत.
- अनेकांना पनवेल नवी मुंबईकडे जावे लागणार नाही. उरण तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांच्या उपचारासाठी फक्त उरण शहरात ग्रामीण रुग्णालय, तालुक्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. सर्वसामान्य नागरिक पनवेल आणि नवी मुंबई येथे उपचारासाठी खर्च करू शकत नाहीत.
-------------------------------------------
रुग्णालयाची इमारत - चार मजली
अधिकारी-कर्मचारी निवास - तीन इमारती
मंजूर निधी - ८४ कोटी ५४ लाख
-------------------------------------
उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून २०१० पासून रुग्णालयासाठी पाठपुरावा केला आहे. आज रुग्णालयासाठी निधी मंजूर आहे, पण काही परवानगीअभावी काम बंद आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर प्रलंबित परवानग्या मिळवून उरणकरांसाठी सुसज्ज रुग्णालय उभे करणे गरजेचे आहे.
- संतोष पवार, सरचिटणीस, उरण सामाजिक संस्था