फॉर्मद्वारे मुंबईकरांचा मत संकलित करण्याचा नवीन प्रयोग
फॉर्मद्वारे मुंबईकरांचा मत संकलित करण्याचा नवीन प्रयोग
रेल्वे प्रवासी संघटनांमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. निवडणूक जाहीरनाम्यातील विषय ठरवण्यासाठी भाजपाने ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या नावाचा गुगल फॉर्म सुरू केला आहे. हा फॉर्म आता रेल्वे प्रवासी संघटना समूहात चर्चेचा विषय ठरत आहे.
फॉर्मच्या माध्यमातून मुंबईकरांना आगामी पाच वर्षांत शहरात कोणत्या सुविधा हवीत, याबाबत थेट मत देण्याची संधी देण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध फॉर्ममध्ये शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, पार्किंग, गृहनिर्माण, मोकळ्या जागा, अतिक्रमण, पर्यावरण, सुरक्षितता अशा प्रमुख १४ समस्या दिलेल्या आहेत. सहभागी लोकांना यापैकी पाच समस्या निवडाव्या लागतात. फॉर्ममध्ये मुंबईकरांच्या नगरसेवकांकडून अपेक्षा, मागील १० वर्षांत साकारलेल्या पायाभूत सुविधांबाबत मत, व्यक्ती किंवा पक्ष यांपैकी कोणाला मतदान करणार यासारख्या प्रश्नांचीही समावेश आहे. याशिवाय महापालिकेच्या रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण याबाबत स्टार प्रणालीने गुणांकन देण्याची मुभादेखील दिली गेली आहे.
राजकीय पक्षाला संधी
गुगल फॉर्ममधून नागरिकांकडून शहराच्या भविष्यासाठी कल्पना, सूचना आणि संकल्पनाही गोळा केल्या जात आहेत. यामुळे फक्त मत संकलनच नाही तर निवडणूक जाहीरनाम्याच्या विषयांची वास्तविक गरज मुंबईकरांच्या नजरेतून समजून घेण्याची संधीही राजकीय पक्षाला मिळणार आहे.