फुलांचा दरवळ महागला
फुलांचा दरवळ महागला
आवक घटल्याने भाव वाढले; पावसाचा फटका
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १ (बातमीदार) ः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे फुल बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. दसरा सणानिमित्त फुलांचे भाव दुप्पट ते चौपट वाढले असल्याने ग्राहकांनी झेंडूच्या फुलाऐवजी अन्य फुले खरेदी करण्याकडे आपला कल दाखवला आहे. गुरुवारी (ता. २) साजरा होत असलेल्या दसरा सणासाठी फुलांची खरेदी करण्यासाठी बुधवारी नागरिकांनी गर्दी केली होती.
महाराष्ट्रात गणेशोत्सव, दिवाळी, दसरा हे मोठे सण आहेत. या सणाला फुलांची मोठी मागणी असते. यंदा मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा फटका फुलांच्या शेतीला बसला असल्याने दादर फुल बाजारात येणाऱ्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दादर मार्केटमध्ये इतरवेळी स्वस्त मिळणारा झेंडू महागल्याचे दादर फुल मार्केटमधील विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या दादर फुल बाजरात झेंडूचा भाव प्रतिकिलो २०० रुपये, मोगरा, अबोली प्रतिकिलो ८०० रुपये, तगर-चमेली प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपये, शेवंती प्रतिकिलो ४०० रुपये तसेच अन्य फुलांच्या भावात प्रतिकिलो मागे भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल महागड्या फुलांऐवजी स्वस्तात मिळणाऱ्या फुलांकडे आहे.
दादरच्या फुल बाजारात नाशिक, पालघर, डहाणू, सफाले भिवंडी, भुसावळ, इगतपुरी, कल्याण, कर्जत विभागातील महिलांनी दसरा सणानिमित्त सोनालू फुले, जाई फुले, कोंबडा फुलांबरोबर भाताची लोंबी, आंब्याची पाने, कडू लिंबाची पाने, तुळशीची पाने, आपट्याची पाने, बेलाची पाने विक्रीसाठी आणली आहेत. गोंडा, मोगरा, शेवंतीची फुले महाग असल्याने या महिलांनी विक्रीला आणलेल्या फुलांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाव वाढल्याने झेंडूच्या फुलांकडे ग्राहकांनी काहीशी पाठ फिरवली असल्याचे दादर मार्केटमध्ये दिसून आले.
असे आहेत भाव
झेंडूचा २०० रुपये
मोगरा-अबोली ८०० रुपये
तगर-चमेली ५०० ते ६०० रुपये
शेवंती ४०० रुपये
जंगली झेंडू एक वाटा - ३० रुपये
सोनालू फुले - तीन नग ३० रुपये
कोंबडा फुले - एक नग १० रुपये
तोरण - एक मीटर ३० रुपये,
जाई फुले- जुडी ३० रुपये
आंब्याची पाने- जुडी २० रुपये
आपट्याची पाने- जुडी ३० रुपये
तुळशीचे पाने- जुडी ३० रुपये
कडू लिंबाची पाने - २० रुपये
सध्या बाजारात गोंडा फुल व अन्य फुले महाग झाली आहेत. आम्ही फुले जंगलातून गोळा करून आणतो आणि स्वतः विकतो. स्वतः विकण्यास परवड नाही, मात्र येण्याजाण्याचा खर्च निघायला पाहिजे.
- हर्षदा थळे, फुलविक्रेत्या
मी इगतपुरीला राहते. कधी फुले, तर कधी लिंबाची पाने विक्रीला घेऊन येते. दसरा असल्याने फुलांना मागणी आहे.
- लता गिरे, विक्रेत्या
दसरानिमित्त झेंडूची फुले खरेदी करते. यावर्षी झेंडू महाग झाला आहे. त्यामुळे बाहेरील विक्रीकरिता आलेल्या महिलांकडून फुले, प्लॅस्टिक फुले व हार खरेदी केले आहेत.
- दीक्षा कदम, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.