डोंबिवलीसाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी
डोंबिवलीसाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी
विद्या निकेतन शाळेच्या फलकामुळे चर्चेला उधाण
डोंबिवली, ता. २ : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून डोंबिवली शहराला सापत्न वागणूक दिली जात आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, महावितरणचे वीजदेयक भरणा अशी विविध माध्यमातून शासकीय कर, शुल्क डोंबिवलीकर वेळच्या वेळी भरत असतात. या कराच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या तिजोरीत भरणा होत असतो; मात्र करभरणा करूनही डोंबिवलीकर कायम उपेक्षित राहिले आहेत. त्यामुळे एकदाच होऊन जाऊ द्या. डोंबिवली शहराची शासनाने स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, तसेच या शहराच्या नागरी समस्यांचे दुखणे कायमस्वरूपी संपुष्टात आणावे, अशी मागणी करणारा फलक सध्या प्रशासनाचे तसेच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्या निकेतन शाळेने आपल्या शालेय बसवर “डोंबिवलीसाठी स्वतंत्र महापालिका करा” असा फलक झळकावल्याने प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष या मागणीकडे वेधले गेले आहे.
डोंबिवली शहराची सध्या अंदाजे १० लाख लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, वीजबिल, इतर शासकीय शुल्क वेळच्यावेळी भरते. या माध्यमातून केडीएमसी आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, मात्र इतका महसूल देणाऱ्या शहराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या नागरी सुविधा, वाहतूक कोंडी, गटारांची समस्या, सुशोभीकरणाचा अभाव या सर्व समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. विद्या निकेतन शाळेचे संचालक विवेक पंडित हे मागील काही वर्षांपासून सामाजिक विषयांवर जनजागृती करत आहेत. फलकाच्या माध्यमातून ते नेहमीच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यंदा फलकावर लावलेला ‘‘स्वतंत्र महापालिकेची मागणी’’ हा संदेश सर्वच स्तरांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
फलकातून सांगण्यात आले आहे की, जर डोंबिवलीसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन झाली, तर येथील नागरी समस्या स्थानिक स्तरावरच सोडवता येतील. आयुक्त व अधिकारी याच शहरात कार्यरत असतील, त्यामुळे निर्णय घेणे आणि अंमलबजावणी दोन्ही सोपे होईल. कल्याणपर्यंत जाऊन कामे लावण्याची गरज भासणार नाही. शहरातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळूनही त्याचा पुरेसा वापर डोंबिवलीच्या विकासासाठी होत नाही. याउलट परिसरातील इतर भागात अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये नाराजी आहे. नागरिकांनी आता ‘आहे माझा हरी, करेल तो काही’ या मानसिकतेतून बाहेर येऊन, स्वतः पुढाकार घेऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यावा, असा संदेशही या फलकातून दिला गेला आहे.
आपला आयुक्त, आपल्याच गावात
डोंबिवली श्हराची आताची विद्रूप झालेली अवस्था पाहता शासनकर्त्यांनी या शहराला देखणे, सुशोभित, सुस्थितीत करण्यासाठी या शहराची स्वतंत्र महापालिका करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकांनीही आता देवासारखे कमरेवर हात ठेवून ‘आहे माझा हरी, काम करून देईल फुकटावरी’ या विचारात न राहता आपल्या शहराची स्वतंत्र महापालिका होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या फलकातून देण्यात आला आहे. आपला कारभार आपल्याच गावात सुरू झाला, तर कोंडीतून वाट काढत कल्याण गाठायला नको. आपला आयुक्त, अधिकारी आपल्याच गावात राहणार असल्याने डोंबिवलीकरांना नागरी समस्या सोडविण्यासाठी पायपीट करायची गरज लागणार नाही, असे फलकातून स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.