कल्याण अवती-भवती
शास्त्रीय नृत्यांचा ‘शक्ती’ फेस्टिव्हल उत्साहात
डोंबिवली (बातमीदार) ः नवरात्रीनिमित्त डोंबिवलीच्या सिद्धी नृत्यकला मंदिराच्या वतीने ‘शक्ती - द डान्स फेस्टिव्हल’चे आयोजन वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले. या नृत्यमहोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, शास्त्रीय नृत्यप्रकारांचे वैविध्यपूर्ण सादरीकरण प्रेक्षकांना अनुभवता आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संगीताचार्य गुरू वैशाली दुधे व भारत पेट्रोलियमचे संचालक राजकुमार दुबे होते. गुरू मनीषा जीत यांनी ‘कृष्णायन’ सादर करत भावनांची सुंदर अभिव्यक्ती केली. गुरू नूतन पतवर्धन यांनी गणेश वंदना व तराणा सादर केला. साजी मेनन यांच्या मोहिनीयाट्टममधून नायिकेची कथा प्रभावीपणे उलगडली. प्राची साठी यांनी देवी स्तुती व गंगाष्टकमद्वारे भारतनाट्यमचे सौंदर्य उलगडले. कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर व भारतीय संस्कृतीचा गौरव नृत्याच्या माध्यमातून प्रकर्षाने दिसून आला. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व भारत पेट्रोलियमने केले. अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांमधून पारंपरिक कलांचे संवर्धन व नव्या पिढीपर्यंत पोहोच करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
.......................
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची शांतता रॅली
कल्याण (बातमीदार) : चिंचपाडा रोड येथील मॉडेल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीनिमित्त शांतता रॅली काढत स्थानिक रस्त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. हातात गांधीजींचे छायाचित्र असलेले बॅनर आणि ‘‘मी आलोय, आता तरी रस्ते बनवा’’ अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अहिंसेचा संदेश देत आपल्या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, जलनिकासी समस्या यावर शांततेत आंदोलन केले. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रत्यक्ष कामे होत नाहीत. त्यामुळे गांधीजींच्या विचारांनी प्रेरणा घेत त्यांनी जनतेचा आवाज होण्याचा प्रयत्न केला. गांधी जयंतीचा उपयोग रस्त्यांच्या प्रश्नासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आल्याने या उपक्रमाला सामाजिक भान लाभले असून, युवकांचे नागरिकत्त्व अधिक जागरूक होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
........................
माहिती अधिकारदिन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण (वार्ताहर) : माहिती अधिकारदिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उपायुक्त वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी कशी करावी, नागरिकांना माहिती कशी द्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, विविध विभागांचे जनमाहिती अधिकारी, सहाय्यक अधिकारी, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते. उपायुक्त गुळवे यांनी माहिती देताना महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे, हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेने माहिती द्यावी, असे सांगितले. पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून कायद्याच्या कलमांची माहिती देण्यात आली. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती अद्ययावत ठेवण्याची विनंती केली. या कार्यशाळेमुळे माहिती अधिकार कायदा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
................................
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पिसवलीत वृक्षारोपण
कल्याण (वार्ताहर) : सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पिसवलीच्या भागवत मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात वन परिक्षेत्र अधिकारी नीलेश आखाडे, शालेय विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले. या उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे यासाठी करण्यात आले. या वेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यजीव व निसर्ग संरक्षणाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाला माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, भाजप मंडळ अध्यक्ष आतिश चौधरी, सरचिटणीस भरत जाधव, महिला आघाडी अध्यक्षा प्रगती भोईर, नीलम भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. अशा उपक्रमांतून पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती घडत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
.........................
राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाला तृतीय क्रमांक
कल्याण (वार्ताहर) : तमिळनाडूच्या दिंडीगुल येथे पार पडलेल्या ७०व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला. संघाचे नेतृत्व दीपाली धुले हिने केले. तिला ‘अपकमिंग प्लेयर ऑफ इंडिया’ हा विशेष सन्मानही देण्यात आला. प्रशिक्षक सारथ पिल्लई आणि संघ व्यवस्थापक कांतीलाल कोलते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्य संघटनेचे सचिव अतुल इंगळे, अध्यक्ष डॉ. पी. के. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. संघातील सर्व खेळाडूंनी निखळ समन्वय साधत सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. महाराष्ट्र संघासाठी हे तिसऱ्यांदा तृतीय स्थान असल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही कामगिरी राज्यातील बॉल बॅडमिंटनला नवी ऊर्जा देणारी ठरत आहे. महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव अतुल इंगळे, अध्यक्ष डॉ. पी. के. पटेल, कार्याध्यक्ष डी. एस. गोसावी संघ प्रशिक्षक शरद पिल्ले, दीपक खरात, लीना कांबळे, राहुल अकुल, पुष्कर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.
....................................
महापालिकेत महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
कल्याण (वार्ताहर) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे अभिवादन कार्यक्रम पार पडला. महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उपायुक्त रामदास कोकरे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी उद्यानातही उपआयुक्त रमेश मिसाळ यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी अहिंसा, सत्य आणि सहिष्णुतेचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प केला. महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सार्वजनिक जीवनात कार्य करणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत या वेळी व्यक्त झाले.
................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.