डम्पिंग ग्राऊंड, कारशेडच्या आरक्षणामुळे नाराजी
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : उत्तन व आसपासच्या पाच गावांसाठी मिरा-भाईंदर महापालिकेने प्रारूप विकास आराखडा नुकताच प्रसिद्ध केला आहे, मात्र या आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या अनेक आरक्षणांवर ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेषकरून आराखड्यात डम्पिंग ग्राउंड व मेट्रो कारशेडचे आरक्षण आहे. त्याच ठिकाणी दाखविण्यात आल्याने ग्रामस्थ नाराज झाले असून, आराखड्यावर मोठ्या संख्येने हरकती नोंदविल्या जाणार आहेत.
उत्तनसह पाच गावांचा विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. त्यावर ग्रामस्थांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांची आराखड्यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच बैठक पार पडली. त्यात आराखड्यात दाखविण्यात आलेल्या आरक्षणांवर ग्रामस्थांकडून जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला आहे. विशेषकरून डम्पिंग ग्राउंड व मेट्रो कारशेडच्या आरक्षणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उत्तन येथे सध्या असलेल्या डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांचा तीव्र विरोध अहे. डम्पिंग ग्राउंडमधून येत असलेल्या दुर्गंधीमुळे, तसेच डम्पिंग ग्राउंडला लागत असलेल्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांना मनस्ताप होत असून, त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर डम्पिंग ग्राउंड उत्तनमधून कायमस्वरूपी हटवावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलनेदेखील केली आहेत. असे असतानाही नव्याने प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखड्यात डम्पिंग ग्राउंडचे आरक्षण सध्याच्या जागेतच दाखविण्यात आले आहे.
मिरा-भाईंदरच्या मेट्रोसाठी डोंगरी गावातील सरकारी जागेवर कारशेड उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे, मात्र त्यासाठी तब्बल १२ हजार झाडांचा बळी द्यावा लागणार आहे. या कत्तलीला स्थानिक, तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. मेट्रो कारशेडसाठी पर्यावरणाचा बळी नको, अशी ठाम भूमिका घेत कारशेड अन्यत्र स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी लगतच्या खोपरा गावातील शेतजमिनीचा पर्यायदेखील ग्रामस्थांनी दिला आहे. या पर्यायाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन सरकारकडून ग्रामस्थांना मिळाले आहे, मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विकास आराखड्यात डोंगरी गावातील सध्या प्रस्तावित असलेल्या जागेतच कारशेडचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. प्रारूप आराखड्यावर ग्रामस्थांकडून मोठ्या संख्येने हरकती नोंदविण्यात येणार असून, त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
चुकीच्या ठिकाणी आरक्षणे
उत्तन व आसपासच्या परिसरासाठी आधीच्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले रस्ते नव्या आराखड्यात दाखविण्यात आलेले नाहीत. उत्तनसह आसपास एकूण पाच गावे आहेत. या प्रत्येक गावासाठी स्वतंत्र मंडईचे आरक्षण दाखविणे आवश्यक होते, परंतु सर्व गावांसाठी मिळून मंडईचे एकच आरक्षण आहे. नव्या आराखड्यात मत्स्यालय दाखविण्यात आले आहे, मात्र ही जागा चुकीची आहे. शिवाय दफनभूमी, रुग्णालय आदी आरक्षणेही चुकीच्या ठिकाणी दाखविण्यात आली आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, अशी माहिती मच्छीमारांचे नेते बर्नड डिमेलो यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.