वाहन, गृहखरेदीचा मुहूर्त
वाहन, गृहखरेदीचा मुहूर्त
नवी मुंबईत दसऱ्याचा उत्साह, सोने दरवाढीमुळे ग्राहकांची पाठ
वाशी, ता. २ (बातमीदार)ः दसऱ्यानिमित्त सोने, चांदी, वाहन तसेच घर खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून रूढ आहे, मात्र यंदा सोने एक लाख २० हजारांच्या घरात गेल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती, तर गृहखरेदी तसेच वाहनखरेदीकडे कल असल्याचे दिसून आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग आल्यामुळे मालमत्ता बाजारातही चैतन्य परतले आहे. विकासकामांचा वेग, वाढलेली पायाभूत सुविधा आणि येणाऱ्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा कल गृहखरेदीकडे वाढला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी दसऱ्यानिमित्त ‘बुकिंगवर सवलत’, ‘झीरो प्रोसेसिंग फी’ अशा आकर्षक ऑफर्स दिल्याने गृहखरेदीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बांधकाम व्यावसायिक प्रकाश बाविस्कर म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि महामार्गांचा विस्तार यामुळे ग्राहक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घरखरेदीकडे वळत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत बुकिंगमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वाहनांमधील जीएसटीच्या दरात झालेल्या कपातीमुळे आणि विविध कंपन्यांकडून आकर्षक ऑफर्स जाहीर झाल्याने वाहनखरेदीत चांगला उत्साह दिसून आला. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर दोनचाकी व चारचाकी वाहनांच्या बुकिंगमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेकांनी दसऱ्याच्याच दिवशी गाडीचे पूजन केले. जीएसटी कपात, कर्जावरील सवलतीमुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी सांगितले.
----------------------------
सराफा बाजाराला फटका
नवी मुंबईतील सराफा बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दसऱ्याच्या दिवशी विक्री ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर गेल्यामुळे अनेकांनी प्रतीकात्मक खरेदी केली. सोनेखरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे काहींनी एक-दोन ग्रॅमचे प्रतीकात्मक दागिने घेतले, मात्र मोठ्या गुंतवणुकीसाठी ग्राहक थांबले आहेत, दर परवडणारे झाल्यावरच पुन्हा खरेदी वाढेल, असे घणसोलीचे मुलसिह दुलावत यांनी सांगितले.
-------------------------
सोने खरेदी करणे कठीण झाले आहे. तसेच सोने घेऊन सांभाळणे ही जिकिरीचे आहे. त्यापेक्षा कार किंवा घरात गुंतवणुकीचा पर्याय चांगला आहे.
- सचिन पाटील, नागरिक
--------------------
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने दसऱ्यानिमित्त नवीन दुचाकी घेतली. विविध सवलती, कमी व्याजदरामुळे सणाचा आनंद साजरा झाला.
- उमेश दिवटे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.