पहलगाममुळे शत्रू कोण हे कळले!
पहलगाममुळे शत्रू कोण हे कळले!
डॉ. मोहन भागवत : रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २ : पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६ नागरिकांना धर्म विचारून मारण्यात आले. यामुळे देशात संतापाची लाट उसळली. आपण सर्वांप्रति मैत्रीपूर्ण भाव ठेवू, तरीही आपल्या सुरक्षेसाठी अधिकाधिक सजग राहावे लागेल आणि सक्षम बनावे लागेल, अशी शिकवण ही घटना देऊन गेली. या घटनेमुळे आपले मित्र कोण, शत्रू कोण आणि ते किती प्रमाणात आहेत हे दिसून आले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. तर विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, प्रांत सह संघचालक श्रीधर घाडगे, महानगर संघचालक राजेश लोया आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पहलगाम हल्ल्याला शासन आणि लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्या लष्कराचे शौर्य आणि समाजाची एकता याचे उत्कृष्ट चित्र दिसून झाले. देशातदेखील अशी असंवैधानिक तत्त्वे असून देशाला ती अस्थिर करू इच्छितात, असेही डॉ. मोहन भागवत यांनी (लडाख घटनेचा उल्लेख न करता) नमूद केले.
...
भारतात आशेचा किरण!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर भागवत म्हणाले, की अमेरिकेने आपल्या हितासाठी नवीन शुल्क धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम सर्वांवर होत आहे. हे सारे चित्र असे नाही की आपण त्यांच्यावर अवलंबून राहावे. राष्ट्र एकटेपणात जगू शकत नाही; पण अवलंबिता ही नाइलाजामध्ये बदलू नये. ती कधी कशी बदलेल याचा काही ठावठिकाणा नाही. जागतिक जीवनाची एकता मान्य करीत यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल, स्वदेशीचा अवलंब करावा लागेल, असे डॉ. भागवत म्हणाले. जग भारताकडे अपेक्षेने पाहात आहे. भारतात आशेचा किरण दिसतो. भारताच्या नव्या पिढीत देशभक्तीची भावना सातत्याने वाढत आहे, असेही ते म्हणाले. संघाची शाखा ही सवयी बदलण्याचा मार्ग आहे. संघाला प्रलोभन दाखवण्यात आले, संघाला राजकारणात येण्याचे आमंत्रण मिळाले; पण संघाने तसे केले नाही. प्रत्येक परिस्थितीत स्वयंसेवकांनी शाखा नित्य चालवली, असे डॉ. भागवत म्हणाले.
...
माझ्या आयुष्यात दोन व्यक्तींचा मोठा वाटा : कोविंद
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विजयादशमीच्या शुभेच्छांनी केली. त्यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यात नागपूरशी निगडित दोन महान व्यक्तींचा खूप मोठा वाटा आहे. एक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे बाबासाहेब भीमराव आंबेडकर. माजी राष्ट्रपतींनी डॉ. हेडगेवारांपासून मोहन भागवत यांच्यापर्यंत संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासात सरसंघचालकांच्या योगदानाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले, की कानपूरच्या घाटमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असताना माझी संघाशी ओळख झाली. जातीय भेदभावापासून मुक्त असणारे लोक संयोगाने संघाचे स्वयंसेवक आणि पदाधिकारीच होते. रामनाथ कोविंद यांनी सांगितले, की संघात जातीय आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही. संघ सामाजिक एकतेचा पुरस्कर्ता आहे. माझ्या जीवनप्रवासात स्वयंसेवकांशी जोडले गेलेले नाते आणि मानवी मूल्यांपासून कशी प्रेरणा मिळाली, याचा उल्लेख मी माझ्या आत्मचरित्रात केला आहे. या वर्षाच्या अखेरीस ते आत्मचरित्र प्रकाशित होईल, असे कोविंद यांनी नमूद केले.
...
शस्त्रपूजनात मिसाइलसह ड्रोन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने ‘शस्त्रपूजन’ केले. संघाच्या मुख्यालयाशेजारील रेशीमबाग मैदानात ही पूजा केली. शस्त्रपूजेदरम्यान पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रांचे प्रतिरूप प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये पिनाका एमके-१, पिनाका एन्हान्स आणि पिनाका मिसाइलसह अनेक आधुनिक शस्त्रे आणि ड्रोन यांचा समावेशदेखील पाहायला मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.