दसऱ्याच्या मुहूर्तावर चार वाहनांची खरेदी
दसऱ्याच्या मुहूर्तावर ४,००० वाहनांची खरेदी
ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह
ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) : दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाणेकरांनी वाहन खरेदीचा ४,००० वाहनांचा टप्पा पार केला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुरुवारी (ता. २) दुपारपर्यंत १०५, तर नवरात्री काळात ४,२२६ दुचाकी-चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. शुभ दिन म्हणून मानल्या जाणाऱ्या या दिवसात वाहनविक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र यंदाही दिसून आले.
सकाळपासूनच शहरातील विविध वाहन वितरकांच्या आवारात वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवीन गाडी घेऊन नागरिक मुहूर्त साधण्यासाठी येत होते. अनेक वाहन वितरकांनी यासाठी विशेष काउंटर, वाहन ताब्यात देण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि संगणकीय नोंदणीसाठी (आता वाहन नोंदणी वाहन वितरकाच्या स्तरावर होत असल्याने) वेगळी सोय उपलब्ध करून दिली होती. यामुळे अर्जदारांना अडचणीशिवाय सेवा मिळाली.
काही शोरूमसमोर तर सजवलेल्या नव्या गाड्यांची रांग लागली होती. ग्राहकांनी परिवारासोबत गाडी खरेदी करून ती देवळात नेऊन पूजा केली. शासनाच्या वाहन नोंदणीबाबतच्या नियमानुरार वाहन वितरकाने नोंदणी केल्यावर वाहनास त्या नोंदणी क्रमांकाची हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावूनच वाहनमालकाच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश वाहनमालकांनी एक-दोन आठवड्यांपूर्वीच वाहन बुक करून वाहन शुभदिनी घेतले. त्यात विशेष वाहन क्रमांक आरक्षित करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मंदीचे वातावरण असतानाही नवरात्री, दसरा आणि दिवाळीचा सण हा नेहमीच ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हंगामी पर्वणी ठरतो. यंदाही ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद दिला. दुचाकी वाहनांना कायमच मागणी असते, मात्र यंदा चारचाकी गाड्यांमध्येही वाढलेली नोंदणी पाहायला मिळाली.
आरटीओ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीत आणि दसऱ्याच्या एका दिवसात वाहनांची नोंदणीची ही लक्षणीय वाढ आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. वाहनविक्रेते आणि आरटीओ प्रशासनाच्या मते, सणासुदीच्या काळात आणखी वाहन विक्री वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषत: दिवाळीपर्यंत विक्रीचा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.
वाहनांची नोंदणी (२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर)
मोटारसायकल २,४८२
चारचाकी (कार) १,००८
इतर ७३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.