जनसुरक्षा कायदा रद्द करा

जनसुरक्षा कायदा रद्द करा

Published on

जनसुरक्षा कायदा रद्द करा
शांती मार्चमध्ये महाविकास आघाडीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी आणलेला जनसुरक्षा कायदा रद्द करा,’ अशी जोरदार मागणी गुरुवारी (ता. २) महाविकास आघाडीने केली. या कायद्याच्या विरोधातील घोषणांनी मंत्रालयाचा परिसर दणाणून गेला. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी आघाडीच्या वतीने मुंबईत शांती मार्च काढण्यात आला.

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोर्ट येथील पुतळ्यापासून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्च काढण्यात आला. या मोर्चात खासदार वर्षा गायकवाड, माकपाचे प्रकाश रेड्डी, आमदार अमीन पटेल, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर, माकपचे शैलेंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, प्रणिल नायर, कचरू यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती आणि सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या गोंडस नावाखाली भाजप महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा सरकारविरोधातील जनसामान्यांचा आवाज दडपण्यासाठी आणलेला आहे. संविधानाने आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा हा कायदा आहे. नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे सक्षम आहेत. त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी या वेळी केली.

महात्मा गांधीजींनी जनआंदोलन केले. त्यांच्या आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. आता हे सरकार जनसुरक्षा कायदा आणून जनआंदोलन करणाऱ्या लोकांचा आवाज दाबून टाकत आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी धार्मिक आणि विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे. धार्मिक दंगे भडकावले जात आहेत.
- प्रकाश रेड्डी, नेते, माकप

लोकशाही व संविधान हा देशाचा आत्मा आहे. सत्य, अहिंसा व सद्भाव हा देशाचा गाभा आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून लोकशाही व संविधानाची पायमल्ली केली जात आहे. विरोधकांचा आवाज दडपला जात आहे. लोकांचे प्रश्न मांडण्याचा लोकप्रतिनिधींचा हक्कसुद्धा हिरावून घेतला जात आहे. देशात लोकशाही व संविधान टिकले पाहिजे, यासाठी हा शांती मार्च काढण्यात आला आहे.
- वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com