ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक जी. जी. पारिख यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक जी. जी. पारिख यांचे निधन

Published on

ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक जी. जी. पारीख यांचे निधन
वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले समाजवादी  विचारांचे नेते  गुणवंतराय  गणपतलाल  पारीख  अर्थात जी. जी.  पारीख  यांचे गुरुवारी (ता. २) वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्युसमयी  १०१ वर्षांचे होते. मुंबईतील  ग्रँट  रोड येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी आणि नातू असा परिवार आहे. त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ताडदेव येथील जनता केंद्रात ठेवण्यात आले होते. या वेळी त्यांच्या सुहृदांना अश्रू अनावर झाले. दुपारी पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणीबाणीविरोधी आंदोलनातही त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजवादी  चळवळींसाठी  स्वतःला वाहून घेतले. १९६१मध्ये युसूफ मेहरअली सेंटरची स्थापना करून देशातील ११ राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून सेंटरच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात शेवटपर्यंत सक्रिय होते.  त्यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक साक्षीदार आणि चालताबोलता इतिहास  हरपल्याची  भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
जी. जी. पारीख यांची कन्या सोनल शाह म्हणाल्या, ‘‘आपल्या कामात कितीही व्यग्र असले तरीही एक पिता म्हणून त्यांनी कधीच मला अंतर दिले नाही. ते खूप चांगले वडील होते. त्यांनी देशसेवेला स्वतःला वाहून घेतले होते. वयाच्या १०१व्या वर्षी आणि निधनाच्या आदल्या दिवशीही ते काम करीत होते. मला त्यांची मुलगी असल्याचा अभिमान आहे.’’
...
जन्म १९२३ मध्ये
पारीख यांचा जन्म ३० डिसेंबर १९२३ रोजी झाला. सौराष्ट्र प्रांत, मग राजस्थान आणि नंतर मुंबई अशा तीन ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. विद्यार्थी असताना त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. पुढे पारीख  यांनी जयप्रकाश नारायण,  युसूफ  मेहर अली  आणि  इतरांसोबत  १९३४ काँग्रेस  सोशालिस्ट  पार्टीची  (सीएसपी)  स्थापना  केली. मुंबईचे महापौर  राहिलेले,  समाजवादी  नेते, स्वातंत्र्यलढ्यातील नेते  युसूफ  मेहरअली  यांचा त्यांच्यावर  मोठा प्रभाव होता.   मेहर अलींच्या  निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ  जीजींनी  युसूफ मेहर अली सेंटरची स्थापना केली.
...
आदरांजली
स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर गांधीवादी-समाजवादी विचारधारेला त्यांनी आपले जीवन समर्पित केले. खादी आणि खादी उत्पादनांच्या सर्जनशील निर्मितीसाठी त्यांनी अनेक  प्रयोग केले. निष्काम कर्मयोग्यासारखे ते जगले. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
- माजी आमदार, कपिल पाटील.
...
जीजींसोबत व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंधही होते. माझे आजोबा दादासाहेब धर्माधिकारी यांच्यापासून त्यांच्याशी ओळख होती. माझे वडील तारा या त्यांच्या संस्थेशी जोडलेले होते. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा महात्मा गांधींची भेट घेणारे स्वातंत्र्यसैनिक आपल्यातून निघून गेले आहेत.
- निवृत्त न्या. सत्यरंजन धर्माधिकारी.
...
जी. जी. पारीख वयाच्या १६व्या वर्षापासून स्वातंत्र्य चळवळीत होते. ‘तारा’च्या माध्यमातून त्यांनी गाव दत्तक घेतले होते. ते गांधीवादी होते. गांधींच्या जयंतीला त्यांचे निधन होणे, हा एक योगायोगच म्हणावा लागेल.
- भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरू
...
आम्ही कधी गांधीजींना पाहिले नाही. आमच्यासाठी जी. जी. हेच गांधीसारखे होते. त्यांच्यासोबत राहून आम्हाला गांधीजींचे विचार कळले तसे आम्ही जगलो. ते पर्यावरणप्रेमी होते. गांधींच्या विचारमार्गावर ते शेवटपर्यंत जगले. त्यांच्या जाण्याने आम्ही काय गमावले, हे शब्दांत वर्णन करता येणार नाही.
- अली भोजानी, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com