न्यू माहीम शाळेची होणार पुनर्बांधणी

न्यू माहीम शाळेची होणार पुनर्बांधणी

Published on

न्यू माहीम शाळेची होणार पुनर्बांधणी
पालिका करणार ५५ कोटी रुपये खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः   माहीमच्या मोरी रोड येथील न्यू माहीम शाळेच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी पालिका तब्बल ५५  कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आधुनिक आणि सुसज्ज अशी शाळा इथे उभी राहणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
माहीम, धारावी परिसरातून मोठ्या संख्येने गरीब विद्यार्थी या शाळेत येतात. तीन वर्षांपूर्वी ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पुनर्बांधणीदरम्यान शेजारील इमारती आणि स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी महापालिकेने कंत्राटदारांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सेफ्टी नेट्स, बॅरिकेडिंग यांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रणाली बसवली जाणार आहे. तसेच पावसाचे पाणी साठवण्याची सोय करण्यात येणार आहे.

१० मजली इमारत
महापालिकेच्या आराखड्यानुसार, १० मजली शाळेची इमारत उभारली जाणार आहे. या नव्या आरसीसी रचनेत तीन जिने, चार उद्‌वाहक, जमिनीखालील व छतावरील टाक्या, सुरक्षा चौकी असेल. शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक्स घालून परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

बाजूची मराठी शाळा पाडण्यास पालकांचा विरोध
न्यू माहीम शाळेची इमारत महापालिकेने धोकादायक घोषित केल्याने पालक संतापले होते. मोरी रोडवरच्या शाळेचा पुनर्विकास न करता दुसरी मराठी शाळाही पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थानिक पालक, मराठी भाषाप्रेमींकडून याला कडाडून विरोध झाला. मोरी रोडची शाळा बांधून पूर्ण करावी आणि त्यानंतर न्यू माहीम एम. एम. छोटानी शाळेची इमारत पुनर्बांधणीसाठी घेण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संस्था, पालक यांच्याकडून होत होती.

Marathi News Esakal
www.esakal.com