नागरी समस्यांविरोधात ‘पिवळे वादळ’

नागरी समस्यांविरोधात ‘पिवळे वादळ’

Published on

विरार, ता. ४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे, अपघातांची मालिका, चालकांचे बळी अशा घटनांमुळे शेकडो मोटारसायकलस्वार, वाहनधारक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. याविरोधात उद्या (ता. ५) बहुजन विकास आघाडीचे ‘पिवळे वादळ’ पालिकेवर धडकणार आहे. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. बविआचा हा प्रशासनाविरोधातील पहिलाच मोर्चा असून, या माध्यमातून पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक नागरी समस्यांना जबाबदार प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी पक्ष झोपेत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर कोणीही उत्तर देत नाही. लोकांचे जीव धोक्यात घालूनदेखील कोट्यवधींची भ्रष्टाचाराने भरलेली कामे दाखवली जातात. यालाच विरोध करण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे, असे बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता अजीव पाटील यांनी सांगितले. या मोर्च्यात माजी महापौर, उपमहापौर, माजी सभापती, नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. हा मोर्चा म्हाडा सर्कल येथून दुपारी ३ वाजता निघून महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चामधून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात आवाज उठवला जाणार आहे. हा मोर्चा फक्त खड्ड्यांचा प्रश्न नसून, वसई-विरारकरांच्या जगण्याचा प्रश्न आहे, म्हणून या धडक मोर्चामध्ये नागरिकांनी सामील व्हावे, असे आवाहन बविआतर्फे करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com