मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच :  प्रा.प्रवीण दवणे

मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच : प्रा.प्रवीण दवणे

Published on

मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच : प्रा. प्रवीण दवणे
महापालिकेत ‘मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य’ विषयावर व्याख्यान

कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : मराठी भाषा ही अमृताचे रसवंतीगृह आहे, पण तिचे योग्य आकलन आणि जपणूक केली नाही, तर घराघरात असलेल्या मराठी भाषेच्या अमृतापासून आपण दूर राहू शकतो, असे प्रख्यात साहित्यिक व कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३) अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या औचित्याने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य’ या विषयावर झालेल्या व्याख्यानासाठी प्रा. प्रवीण दवणे हे प्रमुख वक्ते होते.

प्रा. प्रवीण दवणे यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात अभिजात मराठी भाषेच्या सुरेख काव्याने केली आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी सांगितले की, मराठी भाषा ही आपली वडिलोपार्जित संपत्ती आहे, ज्याची काळजी घेतली पाहिजे. जशी प्राचीन वाड्याची डागडुजी न केल्यास तो ढासळतो, त्याचप्रमाणे पूर्वजांनी उभारलेला मराठी भाषारूपी वाडादेखील सांभाळला नाही तर त्याचा सौंदर्य लोप पावेल. त्यांनी संत ज्ञानेश्वरांपासून संत सावता माळी यांच्या भक्तिपरंपरेतील सोप्या, गोडसर आणि ओघवत्या मराठी भाषेतील गीतांची उदाहरणे देत मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याचे उलगडून दाखवले.

प्रा. दवणे म्हणाले, ‘‘मराठी भाषा ही अमृताचा घडा आहे. त्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी कानाचा डोळा लागतो. जेव्हा कानाचा डोळा होतो, तेव्हा भाषेकडे केवळ कानाडोळा होत नाही. अभिजात मराठी भाषादिन हा दिवस मराठी संस्कृती आणि भाषेच्या जपणुकीचा महत्त्वाचा भाग आहे. पुढील पिढींसाठी धनापेक्षा मनाचा विकास महत्त्वाचा आहे, त्यासाठी मराठीशी जवळीक राखणे गरजेचे आहे.’’

महापालिका सचिव व मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी सांगितले की, ‘‘गेल्या वर्षी मराठी भाषेला शासनाकडून अभिजात मराठी भाषा हा दर्जा मिळाल्यामुळे हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी केले. व्याख्यानाच्या ठिकाणी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेशे गोडसे, मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, उपआयुक्त संजय जाधव, महापालिका सचिव आणि मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके, तसेच माजी नगरसेविका खुशबु चौधरी आणि महापालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी तसेच कला रसिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

लोकांमध्ये जागरूकता वाढवणे गरजेचे
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी भाषणात म्हटले की, ‘‘साहित्य व पुस्तक वाचन दिवसेंदिवस कमी होत आहे. समाजात वाचन संस्कृती वाढवली पाहिजे.’’ त्यांनी आठवड्यात किमान एक दिवस वाचनाचा दिवस म्हणून ठरवण्याचा प्रस्तावदेखील मांडला. महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांनी मराठीतील प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके आणि इतर कवींच्या काव्य पंक्तींचा उल्लेख करून वाचनाचा परीघ वाढवण्याचे आवाहन केले. या व्याख्यानातून मराठी भाषेच्या सौंदर्याचे जतन, वाचन संस्कृतीला चालना देणे आणि मराठी भाषेबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे या विषयांवर भर दिला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com