मराठी संस्कृती, भाषा संकटात
मराठी संस्कृती, भाषा संकटात
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मराठी टिकवण्यासाठी आवाहन
ठाणे, ता. ४ (बातमीदार) : मराठी संस्कृती आणि भाषा सध्या गंभीर संकटात असून, तिचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. मराठी शाळा, भाषा आणि साहित्य वाचवण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी टिकवण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे, असे ठाणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी आवाहन केले.
ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयात तीन दिवस चालणाऱ्या शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मकरंद रेगे, चांगदेव काळे, ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विश्वास पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे सांगितले की, ‘‘कोणत्याही बडेजावाशिवाय आणि व्यावसायिक मोहात न पडता, माझ्या कार्यकाळात प्रत्येक तालुक्यात आणि बाजारपेठांमध्ये ‘मराठी भवन’ उभे करण्याचा मी प्रयत्न करीन. अशा भवनात लहान ग्रंथालय असावे, जिथे नवीन साहित्य वाचले जाईल आणि मराठी शाळांमध्ये घटती विद्यार्थ्यांवर खुली चर्चा होईल.’’ त्यांनी पुढे म्हटले, ‘‘कोणाच्या भीतीने न राहता साहित्यिकांनी आपल्या मतांना प्रामाणिकपणे मांडले पाहिजे. मराठी ही तलम, सुंदर आणि अमूल्य भाषा आहे. तिच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे."
विश्वास पाटील यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले असून, त्यांचा असा मान हा त्यांच्या कष्टाळूपणाचा आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाचा आदर आहे. ‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे ही माझी पूर्वी महत्त्वाकांक्षा नव्हती, पण हा सन्मान मिळाल्याने मला आनंद आहे,’’ असे ते म्हणाले.
चांगला कादंबरीकार संमेलनाचा अध्यक्ष
कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी विनोदी शैलीत म्हटले की, ‘‘गेल्या १० वर्षांत संमेलनात हजर न राहिलेल्या साहित्यिकांना अध्यक्षपद मिळत होते, पण या वेळी माझ्या मित्राला पद मिळाले हे महामंडळासाठी आनंदाची बाब आहे.’’ त्यांनी पुढे म्हटले की, ‘‘चांगला कादंबरीकार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, ही परंपरा अशीच चालू ठेवावी.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर शिरवाडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. निर्मोही फडके यांनी केले.