अवजड वाहतुकीचा पुन्हा घोळ
अवजड वाहतुकीचा पुन्हा घोळ
एका महिन्यात चार परिपत्रके
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : शहरात अवजड वाहतुकीच्या नियोजनासंबंधी पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. गेल्या एका महिन्यात प्रशासनाने अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार वेगवेगळी परिपत्रके काढली असून, त्यातून वाहतूक नियोजनात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सतत होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस आणि वाहतूक कर्मचाऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाने काढलेल्या ताज्या परिपत्रकानुसार, शहरातील रस्त्यांवर अवजड आणि जड वाहनांना दररोज १० तासांपर्यंत वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत जड वाहने शहरात येऊ शकणार नाहीत. हे परिपत्रक ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी जारी केले आहे.
शहरामधील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. वारंवार होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे वाहतुकीचे नियोजन करणे कठीण होत आहे. परिणामी वाहतूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. परिवहन मंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जड-अवजड वाहतूक बंदीच्या परिपत्रकानंतर आता पुन्हा एकदा नवे परिपत्रक काढण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस आयुक्तालयातील हद्दीतून शहरामधील मार्गावरून जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना रोज १० तासांकरिता बंदी घातली आहे. याबाबतचे परिपत्रक त्यांनी गुरुवारी (ता. २) जारी केले आहे. आयुक्तांनी काढलेले वाहतूक बदलाचे हे चौथे परिपत्रक आहे. २७ ऑगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या नियोजनासाठी चार परिपत्रके काढावी लागणे म्हणजेच प्रशासनाचे अपयश असल्याची टीका होत आहे. तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे नियोजन करणे कठीण जात असल्याचे दिसून येत आहे.
परिपत्रकांचा मागोवा
पहिले परिपत्रक (२७ ऑगस्ट) : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाला निर्देश दिले, की जड वाहनांना घोडबंदर मार्ग वापरण्यासाठी बंदी घालावी.
दुसरे परिपत्रक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वाहतूक विभाग यांची बैठक घेत १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत जड वाहनांना १८ तासांच्या बंदीचा आदेश दिला.
तिसरे परिपत्रक : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ५ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत वाहतूक बंदीची घोषणा केली.
चौथे परिपत्रक (१ ऑक्टोबर) : ठाणे पोलिस आयुक्तांनी नवीन आदेश जारी करीत रोज १० तासांची बंदी घातली.
बंदीचा कालावधी
वाहतूक बंदी २ ऑक्टोबरपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.
बंदीची मार्गदर्शक ठिकाणे
ठाणे शहरात येणाऱ्या जड वाहनांसाठी बंदीची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:
कोपरी वाहतूक विभाग - मुंबई, नवी मुंबईकडून आनंदनगर चेकनाकामार्गे
कासारवडवली वाहतूक विभाग - नीरा केंद्र, गायमुख घाट
वागळे वाहतूक विभाग - मुंबईकडून एलबीएस रोडमार्गे
कळवा वाहतूक विभाग - विटावा जकात नाका
मुंब्रा वाहतूक विभाग - पूजा पंजाब हॉटेल, शिळफाटा
नारपोली वाहतूक विभाग - दहिसर मोरी
भिवंडी वाहतूक विभाग - ७२ गाळा, चिंचोटी वसई रोड, पारोळ फाटा (नदीनाका)
कोनगाव वाहतूक विभाग - धामणगाव, जांबोळी पाइपलाइन नाका, बासुरी हॉटेल (सरवली गांव)
कल्याण वाहतूक विभाग - गांधारी चौक, म्हारळ जकात नाका
विठ्ठलवाडी वाहतूक विभाग - उसाटणे नाका, नेवाळी नाका
कोळशेवाडी वाहतूक विभाग - खोणी नाका, निसर्ग हॉटेल
अंबरनाथ वाहतूक विभाग - खरवई नाका, ऐरंजाड
प्रशासनाचा प्रयत्न
वाहतुकीच्या नियोजनासाठी प्रशासन सतत बदल करीत असताना, राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना योग्य नियोजन करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन जड वाहनांवर बंदी घालून शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र यावर परिणामकारक तोडगा कधी लागेल, हे अजून निश्चित नाही.