सुरगड किल्ल्यावर गडपूजन उत्साहात
सुरगड किल्ल्यावर गडपूजन उत्साहात
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुर्गवीर प्रतिष्ठानचा उपक्रम
रोहा, ता. ४ (वार्ताहर) : महाराष्ट्राच्या दुर्ग संवर्धन परंपरेला नवे आयाम देणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानने यंदा दसऱ्याच्या दिवशी रोहा तालुक्यातील वैजनाथ घेरासुरगड गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर गडपूजन सोहळा आयोजित करून एक अनोखा उपक्रम राबवला. आधी तोरण गडाला मग आपल्या घराला, या घोषवाक्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला.
गेल्या १८ वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गवीर प्रतिष्ठान अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ल्यांवर गडसंवर्धनाची कामे करीत आहेत. संवर्धन करीत असलेल्या गडांचा सन्मान आणि पूजन व्हावे, या उद्देशाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरगडावर गडपूजनाचे आयोजन करण्यात आले. यासाठी सकाळी पहाटेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य, खांब पंचक्रोशीतील शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थ गडावर जमले. पहिल्यांदा गडदेवता आन्साईचे पूजन करण्यात आले. दिवे, मशाली प्रज्वलित करून देवीच्या मंदिरात भंडारा, गोंधळ आणि आरती झाली. त्यानंतर गडावरील मारुतीराया व शिवशंभू यांचीही पूजा-अर्चा करून पारंपरिक शस्त्र आणि गड संवर्धनासाठी लागणाऱ्या अवजारांची विधिवत पूजा करण्यात आली. गड संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. आधी गडाचा सन्मान मग आपल्या घराचा उत्सव, हा दुर्गवीर प्रतिष्ठानचा संकल्प या उपक्रमातून ठळकपणे दिसून आला. उपस्थित शिवप्रेमींनी गडसंवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.
...........
या कार्यक्रमाला पारंपरिक लढाऊ कलेचे अनोखे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. तळाघर गावातील भाई मोरे यांच्या शिष्यांनी लीलाधर वाळंज, जितेंद्र वाळंज, शिवंम वाळंज व अवनी माने आदींनी लाठीकाठी आणि ढाल-तलवारीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच पुगाव गावचे मल्लखांबपटू निखिल कलमकर, ओमकार सावरकर, ऋतुराज भोईर यांनी मल्लखांबचे कौशल्य दाखवून उपस्थितांचे मन जिंकले. कामत गावचे पोलिस पाटील आनंदराव सानप यांनी दांडपट्ट्याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाला कोलाड पोलिस ठाण्याचे नरेश पाटील, अजय लोटणकर तसेच खांब विभागीय वनाधिकारी अक्षय ताटे यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह लाभला.