निराधार पालकांना निर्वाह भत्ता मिळणार

निराधार पालकांना निर्वाह भत्ता मिळणार

Published on

निराधार पालकांना निर्वाह भत्ता मिळणार
प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांचे आश्वासन
रोहा, ता. ४ (वार्ताहर) : आपल्या पालकांची जबाबदारी न पेलणाऱ्या व त्यांचा तिरस्कार करणाऱ्या मुलांविरोधात शासनाने कडक भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने व सुरक्षितपणे जगता यावे, यासाठी त्यांना दरमहा १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता मिळवून देण्याचे आश्वासन रोह्याचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिले.
मी निर्वाह प्राधिकरणाचा शासकीय अधिकारी म्हणून, ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित पावले उचलणार आहे. मुलांकडून अपेक्षित आधार मिळाला नाही, तर शासनाकडून त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगत त्यांनी उपस्थित वृद्धांमध्ये नवी आशा निर्माण केली. जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनानिमित्त बुधवारी (ता. १ ऑक्टोबर) ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग सरफळे, पोलिस निरीक्षक मारूती पाटील, उपाध्यक्ष गायकवाड, सचिव सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटील, चंद्रशेखर गुंड, मंगेश जोशी, नंदकुमार भादेकर, संजीवनी कडवेकर, अक्षदा साखलळकर, अनुराधा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना प्रांताधिकारी खुटवड म्हणाले, आपली मिळकत मुलांच्या नावावर करण्याची घाई करू नका. आज नातेसंबंध चांगले असले तरी भविष्यात ते बदलू शकतात. त्यामुळे मृत्युपत्र नोंदवून कायदेशीर सुरक्षितता करून ठेवावी. मला आज तुमच्याकडे पाहताना माझ्या आई-वडिलांची आठवण झाली, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी वृद्धांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात वयाची ८० वर्ष पूर्ण करणारे डॉ. श्रीनिवास वेदक, व्यापारी महमद शेठ डबीर, प्रमोदीनी शिंदे, गुणाजी राजीवले, प्रवीण शाहा, युसूफ रोहावाला अशा अनेक ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच जगप्रसिद्ध रांगोळीकार रुपेश कर्णेकर आणि समाजसेवक बिलाल मोरबेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले, ज्येष्ठ नागरिक म्हणजे संयम, अनुभव, मार्गदर्शन आणि ज्ञान यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांना देवतेप्रमाणे मानायला हवे. सध्याची पिढी मोबाईलमध्ये दंग आहे, पिढी भरकटत आहे, मात्र माझ्या पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठांचा सन्मान केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
.................
चौकट : जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन
१ ऑक्टोबर हा जागतिक नागरिकदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. वृद्ध व्यक्तींना वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने १९९९ रोजी राष्ट्रीय धोरण जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक राज्याने वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करणे अपेक्षित आहे, मात्र निधीअभावी वृद्धांना अनेक सवलती व सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांनी लक्षात आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com