तुम्ही’ म्हणजे भाजप नव्हे - खासदार नरेश म्हस्के
तुम्ही म्हणजे भाजप नव्हे ः नरेश म्हस्के
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : आपण ज्येष्ठ आहात म्हणून आम्ही तुमचा मान राखतो. पण बोलताना भान ठेवावे. आमचे कार्यकर्ते पलटवार करू लागले तर तुम्हालाच यातना होतील. ताकद असेल तर एकटे लढणार आहोत, असे जाहीर करा. मात्र आपण बोलता तेव्हा तुम्ही म्हणजे भाजप नव्हे, हे लक्षात ठेवा, असा टोला खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांना लगावला.
वनमंत्री गणेश नाईक यांनी कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर होईल, असे विधान केले होते. त्यावर बोलताना म्हस्के यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान या ठिकाणी ठेवतोय. त्यामुळे आमच्या तोंडून अपशब्द येणार नाही. परंतु आपण भान ठेवा, असा सल्ला म्हस्के यांनी नाईक यांना दिला. ते आम्हाला गाढव म्हणतात, पण एकनाथ शिंदे हे वाघ आहेत आणि ते त्यांनी सिद्ध केले आहे. उलट ठाकरे हे उंदीर आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करत म्हस्के म्हणाले, शिवाजी पार्कमध्ये गर्दी जमली नाही. राज ठाकरे यांचे भाषण ऐकले आणि मनसेसोबतची युती स्पष्ट झाली. रामदास कदम यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, कदम हे बाळासाहेबांचे विश्वासू होते. त्यांनी बाळासाहेबांचा मृत्यू दोन दिवस आधी झाल्याचे सांगितले आहे. आता यावर उद्धव ठाकरे यांनीच स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन देखील म्हस्के यांनी यावेळी केले.