वालधुनी नदीला पिवळा रंग !
वालधुनी नदीला पिवळा रंग!
अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून, नदीचा रंग वारंवार बदलत असल्याचे निदर्शनास येत आहे. नदीच्या काठी असलेल्या काही जीन्स कारखान्यांमधून थेट रासायनिक सांडपाणी प्रक्रियेशिवायच नदीत सोडले जात असल्यामुळे शनिवारी नदीचा रंग पिवळसर झाला. त्यामुळे तीव्र दुर्गंधी परिसरात पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
अंबरनाथ पूर्व लोकनगरी येथून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षांत राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये गणली जाते. सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी यावर्षीही नदीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध प्रयत्न करत असताना, प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढले आहे. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीतील काही केमिकल आणि जीन्स कंपन्या सांडपाणी थेट नदीत सोडत असल्याने नदीचे प्रदूषण टळलेले नाही.
शहराजवळून वाहणाऱ्या या नदीचे पाणी शनिवारी (ता. ३) पुन्हा एकदा पिवळे झाले होते, तर नदीच्या काठच्या परिसरात उग्र वास पसरल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सांडपाणी आणि रासायनिक पदार्थ सोडल्यामुळे नदीचा रंग आणि गुणवत्ता दिवसेंदिवस बिघडत असल्याचे स्पष्ट दिसून येते, परंतु सर्वांगीण प्रदूषण असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा पर्यावरणप्रेमींनी आरोप केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक वेळा कारखान्यांवर कारवाई केली आहे, तरीही काही कंपन्या बिनधास्तपणे नियमांची उरेस करत, रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडण्याचे प्रकार थांबत नाहीत. पर्यावरण कार्यकर्ते आणि नागरिकांनी अशा कंपन्यांवर कठोर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात की, ‘‘जोपर्यंत निर्णायक आणि कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत नदींना विषारी पदार्थ सोडण्याच्या प्रक्रियेला आळा बसणार नाही.’’ नदीच्या प्रदूषणावर तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात या भागातील पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात येण्याची शक्यता वाढत आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील काही जीन्स कंपन्या थेट सांडपाणी नदीत सोडत असल्याने या नदीचा रंग वारंवार बदलत आहे. शनिवारी या वालधुनी नदीने पुन्हा पिवळा रंग परिधान करत उग्र दर्प परिसरात पसरला. वालधुनी नदीचे प्रदूषण सर्वज्ञात असतानादेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे उघडपणे डोळेझाक करीत आहे. असा आरोप नागरिक करत आहेत. तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
केमिकल कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरीही कंपन्या या कारवाईला जुमानत नाहीत आणि बिनधास्तपणे रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, आता केवळ कारवाई न करता, अशा कंपन्यांवर कठोर गुन्हे दाखल करून त्या कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
परिसरात सुमारे आठ कंपन्या आहेत, ज्या नियमितपणे रासायनिक सांडपाणी नदीत सोडत आहेत. आम्ही याबाबत किमान १० वेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असून, काही कारवाई झाली, पण ती काही काळानंतर टिकत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाची पाठ फिरताच कारखाने पुन्हा नियम मोडत आहेत.
-शशिकांत दायमा, पर्यावरणप्रेमी