मराठी साहित्याचा जागर

मराठी साहित्याचा जागर

Published on

प्रसाद जोशी, वसई
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यावर तिचा मान उंचावला जावा, तसेच ग्रंथालये, वाचनालयांची संख्या वाढत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी पालघर जिल्हा ग्रंथालयाने मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताहातून विविध साहित्यांची भरभरून दालने खुली केली आहेत. त्याला वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

पालघर जिल्ह्यात एकूण ३५ ग्रंथालये, वाचनालय आहेत, तर शासनमान्य पालघर जिल्हा ग्रंथालय आहे. आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत उतरू लागले आहेत. त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत, याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. जिल्ह्यात एकूण ८० हजार पुस्तके उपलब्ध आहेत, ज्यात कादंबरी, काव्यसंग्रह, संदर्भ विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग, कथा, नाट्य व अन्य साहित्य उपलब्ध होत आहे.

ऑनलाइनच्या जमान्यात पुस्तकाची गोडी रुजावी, यासाठी लेखक आपल्या दारी, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे साहित्याची रुची आणि त्यातून ज्ञानार्जनाची शिदोरी मिळू लागली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने सप्ताह साजरा केला जात आहे. पालघर जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ३०० पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्या ठिकाणी विविध लेखकांचे साहित्य वाचता यावे, म्हणून वाचकप्रेमींची गर्दी होऊ लागली आहे. पुस्तक प्रदर्शनातून वाचन संस्कृतीकडे असा प्रवास यानिमित्ताने घडत आहे.

आठवडाभर विविध उपक्रम
विद्यार्थ्यांसाठी काव्य संमेलन, वक्तृत्व स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन ९ तारखेपर्यंत करण्यात आले आहे. एकूण सात शाळांची निवड करण्यात आली असून, शेकडो विद्यार्थी सहभागी होत आहेत.

अध्यक्षांचे साहित्य उपलब्ध
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पहिले ते ९९ वे अध्यक्षपद भूषवणाऱ्या मान्यवरांची पुस्तके जिल्हा पुस्तक प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक मान्यवरांचे साहित्य वाचण्याची संधी एकाच ठिकाणी मिळत आहे.

आदिवासी संस्कृती साहित्य
आदिवासी समाजाने संस्कृती जपली आहे. त्यांची ग्रंथसंपदा वाचकांना कळावी, यासाठी साहित्य उपलब्ध केले आहे. बिरसा मुंडा यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल यांचे साहित्यदेखील वाचकांसाठी ठेवण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात वाचनसंस्कृती बळकट होण्यासाठी जनजागृती, तसेच विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. आपल्या ज्ञानात भर पडावी, यासाठी वाचन हाच एकमेव दुवा आहे. स्पर्धा परीक्षेसह विविध साहित्य उपलब्ध केले जात आहे. अभिजात मराठी भाषादिन सप्ताहात आदिवासी संस्कृतीसह विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
- प्रशांत पाटील, अधिकारी, ग्रंथालय विभाग, पालघर जिल्हा कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com