शहरात अनधिकृत बॅनरचा धडाका
शहरात अनधिकृत बॅनरचा धडाका
नवरात्रोत्सवानिमित्त महापालिकेचा लाखोंचा महसूल बुडीत
तुर्भे, ता. ४ (बातमीदार ) : विविध नवरात्रोत्सव मंडळांच्या माध्यमातून शहरातील बिल्डर आणि नामांकित कंपन्यांद्वारे त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण शहरांमध्ये फुकटात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. महापालिकेच्या एकाही विभाग अधिकाऱ्याने उत्सवादरम्यान कोणत्याही मंडळावर कारवाई केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे एकीकडे शहर विद्रूपीकरणात भर पडत असून, दुसरीकडे महापालिकेच्या लाखो रुपयांच्या महसुलाला फटका बसला आहे.
याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे नोंद केल्यास याला आळा बसू शकेल. तसेच संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी यावर गुन्हे नोंद करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही राजकीय दबावामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
अरेंजा सर्कल, वाशी डेपो, वाशी सेक्टर १७, सेक्टर १, सेक्टर १५/१६, सीबीडी बेलापूर, दिवाळे गाव, अग्रोली गाव, अक्षर चौक नेरूळ, गायमुख चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, कोपरखैरणे गुलाबसन डेअरी, कोपरखैरणे डी मार्ट, ऐरोली सेक्टर ५ चौक, घणसोली यासह सर्वच ठिकाणी गल्लोगल्ली नवरात्रोत्सव मंडळांलगत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारे अनधिकृत जाहिरात फलक लावले आहेत. तसेच काही मंडळांनी एखाद दुसऱ्या कमानीची परवानगी घेऊन अतिरिक्त कमानी लावल्या आहेत. त्याचबरोबर जिथे मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत त्या मंडळांनी खासगी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या देणग्याच्या पावत्या फाडून त्यांचे जाहिरात फलक मंडळाच्या सभोवतालच्या परिसरामध्ये लावले आहेत. अशाप्रकारे संपूर्ण शहरामध्ये संबंधित मंडळांच्या माध्यमातून शहरातील बिल्डर लॉबी आणि नामांकित कंपन्या यांनी फुकटात जाहिरातबाजी करून घेतली आहे. जाहिरातींद्वारे महापालिकेच्या तिजोरीमध्ये प्रतिवर्षी लाखो रुपयांचा महसूल जमा होत असतो; मात्र अशा प्रकारे सण-उत्सवांच्या आडून फुकटात जाहिरातबाजी केल्याने महापालिकेचा लाखो रुपयांच्या महसूल बुडला आहे.
कोट
अनधिकृत बॅनर काढण्याची मोहीम विभागावर हाती घेण्यात आली आहे तसेच बॅनर व इतर काही जाहिराती देखील कारवाई करत काढण्यात आल्या आहेत.
डॉ कैलास गायकवाड, अतिक्रमन उपयुक्त मनपा