ऐरोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक प्रगतीपथावर
ऐरोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रगतिपथावर
१३ कोटी ६५ लाख रुपये खर्च; वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता
वाशी, ता. ४ (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर-१० मध्ये ऐतिहासिक असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा प्रकल्प प्रगतिपथावर असून, या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या स्मारकासाठी नवी मुंबई महापालिकेकडून १३ कोटी ६५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
ऐरोलीतील भूखंड क्रमांक २०२ वरील सुमारे पाच हजार चौ. फूट जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३६ फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. स्मारकाच्या बांधकामाचा कार्यभार स्वस्तिक इन्फ्रालॉजिक्स प्रा. लि. या ठेकेदारांकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले होते. शिवस्मारकाच्या स्थापनेचा उद्देश फक्त ऐतिहासिक पुतळा उभारणे नसून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील पराक्रम व त्यांची गाथा समजून घेता यावी, यासाठी येथे एक ऐतिहासिक संग्रहालयही उभारले जात आहे. या संग्रहालयात शिवकालीन शस्त्र, नाणी, मोडी लिपीतील माहितीपत्रके तसेच छत्रपतींच्या काळातील इतिहासाचे दालन असणार आहे. शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी या स्मारकासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हा भूखंड मिळवून दिला. त्यांनी या प्रकल्पाला त्यांच्या व्यक्तिगत इच्छाशक्तीचा भाग मानले असून, यावर्षी अखेर या स्मारकाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
........
प्रकल्प वेळेत पूर्ण होणार
नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी सांगितले की, स्मारकाचे काम सध्या चांगल्या गतीने सुरू असून, हा प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक नागरिक तसेच ऐतिहासिक वारसा जपणारे संघटनाही या प्रकल्पाचे स्वागत करत आहेत. ऐरोलीतील हा शिवस्मारक नुसता भव्य वास्तू न राहता, तर भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.