जमिनीविना ‘घरकुल’ संकट
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ४ : ‘सर्वांना घरे’ ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होत असला, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. शहापूर तालुक्यात ८७६ लाभार्थ्यांजवळ स्वतःची जमीनच नाही. त्यांना जागा उपलब्ध करून देणे हे सरकार, प्रशासनाचे काम आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १७ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव विचारात घेण्यात आले. त्यामुळे उर्वरित नागरिकांना घरकुल कसे मिळणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती या दरम्यान ‘सेवा पंधरवडा’ सुरू आहे. त्या अनुषंगाने लोकोपयोगी बाबी हाती घेण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने ‘जमिनीचे पट्टे वाटप’ करण्याकडे विशेष बाब म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या दरम्यान तरी हे शक्य होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात या वर्षी ९ हजार ८४६ नागरिकांनी स्वतःचे बेघरपण यंत्रणेपुढे ठेवत घरकुलाची मागणी नोंदवली होती. पात्रतेच्या अटी व इतर निकषांच्या कसोटीवर यापैकी ९ हजार १८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव पात्र ठरले. मात्र, ८७६हून अधिक लाभार्थी हे भूमीहीन आहेत. त्यांच्याकडे घरकुलासाठी आवश्यक असलेली स्वतःची जागा नाही. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे जागेची मागणी केली आहे. प्रशासनाकडेही जागाच उपलब्ध नसल्याने हे लाभार्थी पात्र ठरूनही घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. घरकुल बांधण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्याने प्रशासनानेही हा मुद्दा थंड बस्त्यात गुंडाळला आहे. महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीनुसार आतापर्यंत केवळ ८२८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांच्या घरांचे काय, हा प्रश्न कायम आहे.
विविध योजनांना अडसर
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन उन्नत करणे ही जिल्हा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे म्हणजेच डीआरडीएमार्फत घरकुल योजनेचे कार्यान्वयन केले जाते. घरकुल देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच पीएमएवाय, रमाई आवास योजना, महर्षी वाल्मिकी आवास योजना, शबरी आवास योजना आदींची घोषणा केली आहे. काही योजना समाज कल्याण खात्यामार्फत, काही नगरपंचायतीमार्फत तर काही योजना आदिवासी विभागांमार्फत विकास राबवल्या जातात; परंतु घरकुलासाठी जमीन हा सर्वात मोठा अडसर उभा ठाकला आहे.
तालुक्यात ३०० घरकुल पूर्ण
शहापूर तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे पाच हजार ७९४, तर जनमन योजनेद्वारे चार हजार ५२ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेतील १५४ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर पाच हजार ६४० लाभार्थ्यांचे घरकुल अद्यापही अपूर्ण आहेत. जनमन आवास योजनेतील १४६ लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम निकषानुसार पूर्ण केले आहे. परंतु, तीन हजार ९०६ लाभार्थ्यांची घरकुले अजूनही अपूर्णावस्थेत आहेत.
तालुक्यातील लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन नाही. त्यापैकी काहींना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील ७५४ लाभार्थ्यांची घरे ही आधीपासूनच अतिक्रमित वनजमिनीत असल्याने त्यांचा वनविभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. खर्डी गावातील १७ लाभार्थ्यांना जमीन दिली आहे. उर्वरित ४८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविले आहेत. तर ७४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. जमीन मिळाल्यानंतर या लाभार्थ्यांनी राहत्या घरापासून बाजूला घरकुल बांधून राहण्याची तयारी ठेवावी.
- बी. एच. राठोड, गटविकास अधिकारी, शहापूर
शहापूर : घरकुल योजनेतील घराचे बांधकाम काही ठिकाणी सुरू आहे.