वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थ्यांना नियमांचे धडे
वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थ्यांना नियमांचे धडे
उरण, ता.४ (वार्ताहर): उरण वाहतूक पोलिसांनी एक स्तुत्य उपक्रम राबवत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, जासई येथील शेकडो विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांची माहिती घेऊन ती घरी पालकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांना वाहन चालवताना नियम पाळण्यासाठी प्रेरित करावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उरण वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, शिस्त आणि रस्त्यावर सुरक्षित कसे राहावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ८०० ते ९०० विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांना हेल्मेटचे महत्त्व, सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, आणि ट्रॅफिक सिग्नल्सची माहिती यांसारख्या आवश्यक बाबींबद्दल सोप्या भाषेत समजावून सांगितले. पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी सांगितले की, विद्यार्थी हे भावी नागरिक आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच सुरक्षित वाहतूक संस्कृती रुजण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी मिळवलेली माहिती त्यांच्या पालकांना सांगून, त्यांना जबाबदार वाहन चालक बनण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांच्या या सकारात्मक आणि जबाबदार उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापनाने त्यांचे आभार मानले.