नवी मुंबई महापालिका विशाखा समितीच्या वतीने जागरूकता

नवी मुंबई महापालिका विशाखा समितीच्या वतीने जागरूकता

Published on

नवी मुंबई महापालिका विशाखा समितीच्या वतीने जागरूकता
वाशी, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका परिमंडळ १ अंतर्गत कार्यरत महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी पालिकेच्या विशाखा समितीच्या वतीने जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश महिला सुरक्षा व कार्यस्थळी लैंगिक छळविरोधी उपाययोजना याबाबत माहिती देणे हा होता. शारदीय नवरात्रोत्सव व सशक्त नारी, स्वस्थ कुटुंब, या उपक्रमासोबत या शिबिराने जागरूकता आणि प्रशिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण केले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त व नवी मुंबई महापालिकेच्या विशाखा समितीच्या अध्यक्ष अभिलाषा पाटील, समाज विभागाच्या उपआयुक्त नयना ससाणे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नाप्रभा चव्हाण, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे आणि अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष अभिलाषा पाटील यांनी शिबिरात सांगितले की, महिला कर्मचाऱ्यांनी विशाखा समितीची कार्यपद्धती, लैंगिक छळा म्‍हणजे काय याची सविस्तर माहिती असावी. त्यांनी आरोग्य, शिक्षण व परिवहन विभागांतर्गत कार्यरत विशाखा समित्यांचे कार्य स्पष्ट केले. डॉ. रत्नाप्रभा चव्हाण यांनी महिलांना घरातील मंत्री म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन मांडला. सचिव चित्रा बाविस्कर यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यावर समान दृष्टिकोन ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले. उपायुक्त नयना ससाणे व डॉ. कैलास गायकवाड यांनी गोपनीयता, दक्षता व न्याय सुनिश्चित करण्याच्या बाबतीत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या शिबिरातून महिला सुरक्षा व जागरूकतेच्या विषयावर कर्मचारी वर्गात सकारात्मक संवाद निर्माण झाला, ज्यामुळे कार्यस्थळ अधिक सुरक्षित व संवेदनशील बनेल, असा विश्वास व्यक्त केला गेला.

Marathi News Esakal
www.esakal.com