२८ लाखांचे सोने तारण कर्ज काढणाऱ्या दोघांवर गुन्हा
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : सोने तारण कर्ज काढण्याच्या नावाने एका महिलेसह पुरुषाने कमी कॅरेटचे सोने २२ कॅरेटचे भासवून काल्हेर येथील पतसंस्थेची तब्बल २८ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रितु संदीप सिंग (२८) आणि राजन रामलोचन शुक्ला (३२) गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काल्हेर येथील आधार नागरी सहकारी पतसंस्था येथे रितूने तिच्याकडील १ ते ६ कॅरेटच्या १३४.३ ग्रॅम वजनाच्या आठ बांगड्या व एक सोनसाखळी (२२ कॅरेट) हॉलमार्कचे असल्याचे भासवून तारण कर्जासाठी जमा केले. राजनने २३ जुलै ते २० सप्टेंबर या कालावधीत याच पतसंस्थेत एक ते सहा कॅरेटचे एकूण ४५५.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ९१६ (२२ कॅरेट)चे भासवून आधार पतसंस्थेकडून २८ लाख ३० हजारांचे सोने तारण कर्ज घेत फसवणूक केली. याप्रकरणी बुधवारी (ता. १) पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास चौधरी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.