दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार

दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार

Published on

मुरबाड, ता. ४ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. २) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. या वेळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मन शांत ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून काम केले पाहिजे. यामुळे पक्ष बळकट होईल, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत की ठेकेदार, हे पाहावे; अन्यथा आपल्याला आपली ठेकेदारीच करावी लागेल. तसेच महिलांना सन्मान देणे आवश्यक असून, लाडक्या बहिणींना वेळेवर मानधन मिळते आणि राज्य सरकार त्यांचा पाठिंबा कायम ठेवते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीसाठी मार्गदर्शन केले. चंद्रकांत बोस्टे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली, तर प्रतिक हिंदुराव यांनी कार्यकर्त्यांना तसेच युवा पदाधिकाऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहापूरचे आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश किसन तारमले, संजय तिवरे, ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भरत गोंधळे, ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रतिक हिंदुराव, महिला जिल्हाध्यक्ष ठाणे कल्पना तारमले, ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी, मुरबाड तालुकाध्यक्ष चंद्रकांत बोष्टे, कल्याण तालुकाध्यक्ष बाळाराम कोर, शहापूर तालुकाध्यक्ष मनोहर सासे, भिवंडी तालुकाध्यक्ष विजय पाटील, याशिवाय शहापूर, मुरबाड, बदलापूर, कल्याण येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com