अंबरनाथमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात साजरा

अंबरनाथमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात साजरा

Published on

अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’चा ऐतिहासिक अध्याय रचला. या प्रेरणादायी दिवसाच्या स्मरणार्थ अंबरनाथ शहरातील लोकनगरी परिसरात भीम गर्जना मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. २) विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानावर आधारित सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रम सादर करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाच्या मूल्यांचा प्रसार व्हावा, यासाठी विशेष उपक्रम रचले. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार आणि नव्या पिढीपर्यंत त्यांच्या कार्याची प्रेरणा पोहोचवणे, हेच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात प्राचार्य विकास जाधव आणि अ‍ॅड. जय गायकवाड यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. प्राचार्य जाधव म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र आजही तितकाच जिवंत आहे. शिक्षणच समाजातील अंधार दूर करण्याचे सर्वांत प्रभावी साधन आहे. तर अ‍ॅड. गायकवाड यांनी सांगितले, संघटनशक्तीतून सामाजिक बदल घडवून आणता येतो. बौद्ध धम्म म्हणजे मानवतेचे तत्त्वज्ञान आहे. रामकृष्ण भोजने, नरेश पवार, मुकेश थोरात, भारत डावरे, मिलिंद सोनावणे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. परिसरातील नागरिक, बौद्ध बांधव आणि तरुणांनी उपस्थित राहून सोहळ्याला प्रतिसाद दिला.

Marathi News Esakal
www.esakal.com