उल्हासनगरातील २२८३ लाडक्या बहिणी अपात्र

उल्हासनगरातील २२८३ लाडक्या बहिणी अपात्र

Published on

उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : लाडकी बहीण योजनेतून उल्हासनगरातील तब्बल दोन हजार २८३ महिलांचा लाभ रद्द झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पात्र-अपात्रतेबाबत निर्माण झालेला गोंधळ, ई-केवायसीतील तांत्रिक अडथळे आणि खात्यातील पैसे थांबणे यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार कुमार आयलानी यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच अपात्र महिलांच्या आकड्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
उल्हासनगर शहरातील महिलांना लाभ देणारी लाडकी बहीण योजना काही महिन्यांपासून अडचणीत सापडली होती. अनेक महिलांच्या खात्यात पैसे न येणे, ई-केवायसी प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे, पात्र-अपात्रतेची स्पष्ट माहिती न मिळणे यामुळे मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर आल्या. याच पार्श्वभूमीवर आमदार आयलानी यांनी शुक्रवारी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि नगरसेवकांची विशेष बैठक घेतली. बैठकीत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा समोर आला की, योजनेच्या पात्रतेच्या तपासणीत प्रथम ८६६० महिलांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, पुनर्निरीक्षणानंतर पाच हजार ८६४ महिलांना पुन्हा पात्र घोषित करून सरकारला अहवाल पाठविला आहे. दोन हजार २८३ महिलांचा लाभ कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. यामध्ये २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिला, दोनपेक्षा जास्त महिलांचे नावे असलेले रेशनकार्ड धारक, तसेच संपर्कविहीन लाभार्थींचा समावेश आहे. मात्र, अपात्र महिलांच्या आकड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, महेश सुखरमाणी, प्रशांत पाटील, अर्चना करणकाळे, टोनी शिरवानी, डॉ. एस. बी. सिंग, संजय सिंह, हेमा पिंजानी, अमर लुंड, महादेव बगाडे, मंगला चांडा, उमेश सोनार तसेच महिला व बाल कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


समस्या लवकरच सोडवणार
बैठकीत आयलानी यांनी सीपीडीओ विजय तावडे यांना विचारणा केली की, ई-केवायसी संकेतस्थळ वारंवार बंद का पडते. त्यावर तावडे यांनी स्पष्ट केले की, ही समस्या आधार कार्डच्या केंद्रीय पोर्टलशी संबंधित असून, ती लवकरच सोडवली जाईल. नगरसेवकांनी निदर्शनास आणले की, शहरातील जवळपास ५० टक्के महिलांना योजनेबाबत योग्य माहितीच मिळालेली नाही. यावर आमदारांनी प्रशासनाला व्यवस्थित जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश दिले. पात्र व अपात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले.

लाडकी बहीण योजना ही आपल्या शहरातील महिलांसाठी दिलासा देणारी योजना आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना लाभ मिळणे थांबले आणि त्यांचा संभ्रम वाढला. २२८३ महिलांचा लाभ रद्द झाल्याने आम्हालाही वेदना होत आहेत. कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये हीच भूमिका आहे. सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करावे आणि पात्र महिलांना तत्काळ लाभ मिळवून द्यावा, असे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. या योजनेबाबत शहरात जनजागृती वाढवून पारदर्शकता ठेवली जाईल.
- कुमार आयलानी, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com