गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग, किनारी रस्ता प्रकल्पाला गती द्यावी
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग, किनारी रस्ता प्रकल्पाला गती द्यावी
पालिका आयुक्तांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग आणि मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यांनी आज शनिवारी (ता. ४) या दोन्ही प्रकल्पांची प्रत्यक्षस्थळ पाहणी करून कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच आवश्यक त्या परवानग्या आणि जमिनींचे संपादन जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पालिका आयुक्त गगराणी यांनी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पस्थळास भेट दिली. या प्रकल्पांतर्गत १.२२ किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) आणि बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराचे जुळे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या बोगद्यांची रुंदी ४५.७० मीटर असून, ते २० ते १६० मीटर खोलीपर्यंत जमिनीखाली असतील. या बोगद्यांमध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुवीजन प्रणाली, सीसीटीव्ही नियंत्रण, अग्निरोधक यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच पर्जन्य जलवाहिनी आदी सुविधा असणार आहेत. गगराणी यांनी या सर्व घटकांची सविस्तर माहिती घेतली.
बोगदा खोदकामासाठीचे अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन नुकतेच जपानहून दाखल झाले असून, दुसऱ्या टनल बोरिंग मशीनचे भाग डिसेंबरपर्यंत येणार आहेत. सध्या लॉन्चिंग शाफ्ट खोदण्याचे काम सुरू असून, साडेतीन मीटर खोलीपर्यंत काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर आयुक्त गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता (उत्तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्प स्थळासही भेट दिली.
चारकोप, गोराई, मालाड मरिना एन्क्लेव्ह, एक्सर आणि दहिसर परिसरातील कामांची त्यांनी पाहणी केली. रस्ता संरेखन, बांधकाम स्थळांकडे जाणारे पोहोच रस्ते आणि कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमिनींची उपलब्धता याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. या पाहणीवेळी उपायुक्त शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी तसेच प्रकल्प सल्लागार उपस्थित होते. पालिका आयुक्तांनी दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक मंजुऱ्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून मुंबईतील पूर्व–पश्चिम तसेच किनारी भागांमधील संपर्क सुधारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे निर्देश या वेळी दिले.
बोगद्यात अद्ययावत प्रकाशव्यवस्था आदी सुविधा
जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुवीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश आहे. पर्जन्य जलवाहिनी आदी उपयोगिता वाहिन्यांची तजवीजदेखील बोगद्याखाली करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.