थोडक्यात नवी मुंबई
खारघरमध्ये भव्य रावण दहन सोहळा
खारघर, ता. ४ (बातमीदार) ः खारघर सेक्टर ७, उत्सव चौक जवळील मोकळ्या मैदानात गुरुवार रात्री नऊच्या सुमारास खारघर कॉलनी फोरमच्या वतीने भव्य रावण दहन सोहळा पार पडला. या सोहळ्यात ५५ फूट उंचीचा रावण पुतळा ज्वलित केला गेला. हा नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण व डोंबिवली परिसरातील एकमेव उंचीचा रावण दहन म्हणून ओळखला जातो.
या उत्सवाला पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून पारंपरिक गीत, ढोल-ताशांच्या गजरात रावण दहन झाले. कॉलनी फोरमचे पदाधिकारी लीना गरड, मधू पाटील व बालेश भोजने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी या परंपरेच्या जपणुकीसाठी पुढील वर्षीही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची शपथ घेतली. हा सोहळा फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे तर समाजात ऐक्य व एकोपा निर्माण करण्याचे प्रतीक ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. उपस्थितांनी या परंपरेचे कौतुक करत भविष्यातही असे आयोजन होण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
.............
वीर वाजेकर महाविद्यालयात शासकीय दाखले वाटप शिबिर
उरण (वार्ताहर) ः रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व उरण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दाखले वाटप शिबिर नुकतेच महाविद्यालयात आयोजित करण्यात आले. उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या पुढाकाराने या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. विद्यार्थ्यांना लागणारी शासकीय कागदपत्रे थेट महाविद्यालयात बनवून देण्याचा हा अभिनव उपक्रम ठरला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. अमोद ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्र अद्यावत ठेवण्याचे महत्व स्पष्ट केले. या शिबिरात गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, तलाठी आणि शिक्षक उपस्थित होते. सुमारे ७२ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. प्राध्यापक मंडळ व महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी या उपक्रमात विशेष मेहनत घेतली. हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरी व व्यवसायासाठी कागदपत्रांची सोय करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
...............
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेघा आरोग्य शिबिर
खारघर (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये मोफत मेघा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अटल फाउंडेशन व भाजप खारघर यांच्या पुढाकाराने तसेच मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. रामशेठ ठाकूर शाळेच्या मैदानावर आयोजित शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा, डोळे, फुफ्फुस, त्वचारोग, केस व पचनसंस्थेची तपासणी करण्यात आली. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. भाजप रायगड उत्तर जिल्हा चिटणीस ब्रीजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.
.......................
नेरूळ प्रवेशद्वारावरील खड्ड्यांमुळे नाराजी
जुईनगर (बातमीदार) ः नेरूळचे प्रवेशद्वार असलेल्या सायन-पनवेल महामार्गाजवळील रस्ता दयनिय अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिकेकडून काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे प्रयत्न झाले असले तरी ते अपुरे ठरले आहेत. चौकातील चारही बाजूंना काँक्रेटीकरण करून या खड्ड्यांचे कायमस्वरूपी निवारण करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
...............
पावसाळ्यानंतर वृक्षछाटणीवर नाराजी
जुईनगर (बातमीदार) ः नेरूळ एलपी येथील एका मिठाई दुकानाजवळील वृक्षछाटणीमुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यानंतर ही छाटणी चुकीची असल्याचे नागरिकांचे मत आहे. काही ठिकाणी फांद्या रस्त्यावर येऊन धोका निर्माण करत असल्या तरी योग्य नियोजनाशिवाय छाटणी केल्याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरणप्रेमींनी महापालिकेकडे या बाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. वृक्षांचे रक्षण हे बदलत्या हवामान परिस्थितीत अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या बदल्यात काळात वृक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे महापालिकेने वृक्ष छाटणी झालेल्या ठिकाणची पाहणी करून या घटनेची माहिती घेत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आबा रणवरे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.