सायबर गुन्ह्यांसाठी मानवी तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
सायबर गुन्ह्यांसाठी मानवी तस्करी
गुन्हे शाखेकडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा क्रमांक १ने सायबर गुन्हे करण्यासाठी भारतीय तरुणांची परदेशात तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आसिफ खान ऊर्फ नेपाळी आणि रोहित कुमार मरडाणा या दोन आरोपींना अटक केली असून, लवकरच आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
मिरा रोड येथील सय्यद इरतिझा हुसैन आणि अम्मार लकडावाला या दोन तरुणांना आसिफने थायलंडमध्ये चांगल्या नोकरीचे प्रलोभन दाखवले. त्यानंतर त्यांना बेकायदा म्यानमार येथील ‘युयु४’ नावाच्या सायबर गुन्हेगारी करणाऱ्या कंपनीकडे पाठवण्यात आले. या तरुणांना चिनी वंशाचा लिओ आणि भारतीय वंशाचा स्टिव्ह आण्णा यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून भारतीय मुलींच्या नावावर बनावट फेसबुक खाती उघडून परदेशातील भारतीयांशी मैत्री करण्यास आणि त्यांना क्रिप्टोकरन्सी व बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची फसवणूक करायला लावली जात होती.
पीडित तरुणांना इमारतीबाहेर जाण्यास बंदी होती आणि काम न केल्यास त्यांचा शारीरिक छळ केला जात असे. सुटकेसाठी आरोपींनी त्यांच्याकडून प्रत्येकी सहा लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर त्यांची म्यानमारमधून सुटका झाली. दोन्ही तरुणांनी दिलेल्या तक्रारीवरून नयानगर पोलिस ठाण्यात एकूण आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना या टोळीने किमान १० ते १२ भारतीय तरुणांची तस्करी केल्याची माहिती मिळाली असून, म्यानमारमध्ये आणखी अनेक भारतीय तरुण डांबून ठेवल्याची शक्यता आहे. या टोळीत सहभागी असलेल्या इतरांना लवकरच अटक करण्यात येणार असून, फसवणूक झालेल्या तरुणांच्या नातेवाइकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.