मासेमारीला हवामानाचा फटका
मासेमारीला हवामानाचा फटका
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : अतिवृष्टी, वादळी वारे यामुळे यंदा पारंपरिक कोळीबांधवांच्या मासेमारी हंगामाला फटका बसला आहे. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला सुरुवातीपासूनच हवामानाच्या संकटांचा सामना करावा लागला. ऑगस्ट-सप्टेंबर हे महिने सामान्यतः मासेमारीसाठी पोषक असले तरी, यंदा या काळात सतत असलेले खराब हवामान, वादळे, अतिवृष्टी आणि समुद्राच्या भरतीमुळे पारंपरिक मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. यामुळे नवी मुंबईतील कोळीबांधवांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
यंदा नारळी पौर्णिमेनंतर अचानक सुरू झालेल्या वादळी हवामानामुळे मासेमारी काही दिवस ठप्प पडली. काही काळानंतर मासेमारी सुरू झाली असली तरी गौरी-गणपती आणि नवरात्रोत्सवाच्या काळात पुन्हा अतिवृष्टी, वादळी वारे व समुद्राची मोठी भरती सुरू झाल्यामुळे मासेमारी खंडित झाली. वादळी हवामानामुळे बोटी समुद्रात अडकल्या. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करणे शक्य झाले नाही. अशा प्रकारे सतत सुरू असलेल्या हवामानाच्या अपवादामुळे पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. विशेषत: दिवाळे, वाशी, ऐरोली, दिवा यांसारख्या कोळीवाड्यांतील स्थानिक मच्छीमारांचे उत्पन्न घटले आहे.
याशिवाय, तळोजा औद्योगिक वसाहतीतील अनेक रासायनिक कंपन्यांतून प्रदूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने खाडीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. या प्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेकडो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकविरा मच्छीमार सेवा संस्थेचे अध्यक्ष विष्णू कोळी यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत स्थानिक प्रशासनाकडे तातडीची मदत मागितली आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर या मासेमारीसाठी सामान्यतः अत्यंत पोषक महिने मानले जातात, परंतु यंदा खराब हवामान, वादळे आणि प्रदूषणामुळे या काळात मच्छीमारांनी अपेक्षेप्रमाणे मासेमारी करू शकले नाहीत. मासेमारीसाठी केलेला खर्च जास्त, तर मिळकत कमी झाल्याने पारंपरिक मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायाशी संबंधित अनेक घटकही संकटात सापडले आहेत. ही परिस्थिती पुढे गेल्यास स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तरच आर्थिक परिस्थितीत सुधारणा
गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून तातडीने मदतीचे निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून मच्छीमारांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. तसेच प्रदूषण आणि हवामानातील बदल यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा पारंपरिक मासेमारी व्यवसाय पूर्णपणे धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे कोळीबांधवांसाठी या संकटाचा तातडीने परिणामकारक तोडगा काढणे आवश्यक आहे, नाहीतर यामुळे स्थानिक समाजावर मोठा आणि दीर्घकालीन परिणाम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.