चतुरांमुळे परतीच्या पावसाचे संकेत

चतुरांमुळे परतीच्या पावसाचे संकेत
Published on

चतुरांमुळे परतीच्या पावसाचे संकेत
डासांचा नैसर्गिक शत्रू, हवामान बदलाचा सूचक

राजीव डाके : सकाळ वृत्त सेवा
ठाणे शहर, ता. ५ : ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरल्याने डासांचा फडशा पाडणारे चतुर (ड्रॅगनफ्लाय) मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. ठाणे, मुंबईच्या खाडी आणि तलावांच्या ठिकाणी त्यांचे भिरभिरणे दिसू लागल्याने लवकरच पाऊस परतीच्या प्रवासाला लागणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. चतुरांमुळे वाढत्या डासांचादेखील काही प्रमाणात बंदोबस्त होत असल्याचे दिसत आहे. हे चतुर केवळ डासांचे भक्षण करणारे कीटकच नसून बदलत्या हवामानाचे चित्र सांगणारा शास्त्रज्ञसुद्धा आहे.

आपल्या डोक्यापासून काही अंतरावर उडणारा रंगबेरंगी चतुर कीटक ठाणे, मुंबईच्या खाडीकिनारी मोठ्या संख्येने दिसू लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पायथा, तलाव, उद्याने आणि पानफुलांच्या ठिकाणी पाणथळांच्या परिसरात तो नजरेस पडू लागला आहे. डास, माशी हे त्याचे आवडीचे खाद्य आहे. पर्यावरण अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांच्या मते चतुर मोठ्या प्रमाणात दिसू लागले की परतीचा पाऊस जवळ आल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. ते नुसते कीटक नाहीत तर हवामानाचा अंदाज देणारी निसर्गाची वेधशाळादेखील आहे. त्यांच्या निरीक्षणातून निसर्गात होणारे बदल, बदलते हवामान याचे निरीक्षण करणे सोपे जाते.

भारतामध्ये असलेल्या सुमारे ४५० प्रजातींपैकी महाराष्ट्रात सुमारे १५० प्रजाती आढळतात. डासांचा फडशा पाडणारा हा छोटासा कीटक मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया यांसारख्या आजारांविरुद्ध नैसर्गिक संरक्षक देतो. एका दिवसात शेकडो डासांचा नाश करण्याची ताकद त्याच्यात असते. त्यामुळे चतुरांची संख्या कमी झाली तर डासांचा सुळसुळाट वाढेल आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट कोसळेल, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जातो.

भारतातून आफ्रिकेपर्यंत प्रवास
‘वॉन्डरिंग ग्लायडर’ ही प्रजाती तर भारतातून आफ्रिकेपर्यंत १४ ते १८ हजार किलोमीटर लांब प्रवास करते. इतके लांब स्थलांतर करणारा इतर कोणताही कीटक जगात पाहण्यात आला नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात चतुर दिसले की पाऊस येतो, हा विश्वास फार पूर्वीपासून शेतकरी मानत आला आहे. आफ्रिकेत त्यांना पावसाचे दूत, चीनमध्ये यश आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते.

हवामान बदल, शहरांचा फैलाव, पाणथळ जागांचा ऱ्हास आणि रासायनिक प्रदूषण यामुळे चतुरांची संख्या घटत आहे. त्यांचे प्रजननस्थळ असलेले तलाव, डबकी, गवताळ किनारे नष्ट झाल्यास त्याचा थेट फटका पर्यावरण संतुलन आणि डास नियंत्रणाला बसणार आहे. म्हणूनच प्रत्येकानेदेखील पर्यवारणाची काळजी घेणे आवश्यक ठरते.
- दिवाकर ठोंबरे, पर्यावरण अभ्यासक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com