भातकापणीची कामे लांबणार

भातकापणीची कामे लांबणार

Published on

वाणगाव, ता. ५ (बातमीदार) : सध्या पालघर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण, काही ठिकाणी रिमझिम पाऊस अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले आहे. हळवे भातपीक कापणीस तयार झाले आहे, परंतु नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्यापही भातशेतीतील पाणीसाठ्याचा पूर्णपणे निचरा झालेला नाही. सध्या स्वच्छ वातावरण आणि पावसाची उघडीप असणे आवश्यक होते, परंतु ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाचे संकेत असल्याने भातपीक कापणीस तयार झाले असतानाही कापणी करता येत नाही. त्यामुळे यंदा कापणीची कामे लांबणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

मागील वर्षी परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कापलेले भातपीकही शेतातच कुजले होते. त्यामुळे उत्पादनासह पावलीवर विपरीत परिणाम झाला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्याला दुहेरी संकटांचा सामना करावा लागला होता. परतीचा पाऊस संपल्यानंतरच जिल्ह्यातील भातशेतीच्या कापणीला सुरुवात होईल, असा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे.

अजूनही भातशेती खाचरात आडवीच
सद्यस्थितीत हळवे भातपीक पक्वतेच्या, तर निमगरवे भातपीक दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. या अवस्थेत दाण्यांनी भरलेल्या लोंब्यामुळे पिकांचे वजन वाढलेले असते. अशा अवस्थेत अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने भातपीक लवकर आडवे पडून पाण्यात भिजून लोंबी खराब झाली आहे. सतत पाऊस पडत राहिल्यामुळे लोंबी भिजून त्यास मोड येऊन लोंब्याना बुरशी आली आहे. जोपर्यंत स्वच्छ वातावरण आणि पावसाची उघडीप मिळत नाही, तोपर्यंत भातशेती पूर्वअवस्थेत येणार नसून कापणेही उशिराने होण्याची शक्यता आहे.

पावली काळी
काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याच्या आधी काही शेतकऱ्यांनी भातपीक कापण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिवृष्टी झाल्याने कापलेले भातपीक शेतातच राहिल्याने पावली काळी पडली आहे. पावलीची प्रत खालावल्यामुळे नुकसानीचा सामना सहन करावा लागत आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे यंदा परतीचा पाऊस झाल्यानंतरच शेतकरीवर्ग भातशेती कापणीच्या मार्गावर वळणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

हळवे भातपीक कापणी योग्य झाले आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाची चिन्हे जाणवत असल्याने भातकापणीची कामे पुढे ढकलण्यात आली आहेत.
- संजय पाटील, शेतकरी, डहाणू

पालघर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी हळवे भातपीक कापणीस तयार झाले आहे, परंतु पावसाची शक्यता असल्याने कापणी शक्यतो १० ऑक्टोबरनंतर पावसाचा अंदाज बघून करावी.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com