पाठलाग/ पंकज रोडेकर

पाठलाग/ पंकज रोडेकर

Published on

पाठलाग/ पंकज रोडेकर
ओळखीनेच केला घात
मुंब्र्यातील महिलेच्या घरातून तब्बल ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. यादरम्यान ना घराच्या दरवाजाचा कडीकोंयडा तोडलेला, ना खिडकीची काच फुटलेली. यामुळे या चोरीचा तपास करणे पोलिसांसमोर एक आव्हानच होते. मुंब्रा पोलिसांनी कोणतेच धागेदोरे नसताना नव्या तंत्रज्ञानाचा आणि इतर तांत्रिक बाबींचा वापर करीत तपासचक्रे फिरवली आणि मोबाईल लोकेशनद्वारे नातेवाईक महिलेला ताब्यात घेतले. सुरुवातीला तोंडून चकार शब्दही न काढणाऱ्या सानिया बेग यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्या पोपटासारख्या बोलू लागल्या.
तक्रारदार महिला हिना सुर्वे (वय ४६) या पती परदेशात नोकरीला असल्याने त्या दोन मुलींसह मुंब्र्यात वास्तव्यास आहेत. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी सुट्टी असल्याने हिना सुर्वे या मुलींसह त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी त्या पतीसोबत आफ्रिकेत राहत असताना खरेदी केलेले आणि लग्नाच्या वेळी मिळालेले असे एकूण ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घरातील कपाटात होते. आईकडे जाण्यासाठी त्यांनी घरातील कपाटामधून खर्चासाठी पाच हजार रुपये काढले. या वेळी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख २० हजार रुपये होते. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी वीजबिल भरण्यासाठी कपाटात ठेवलेले पैसे काढण्यासाठी गेले असता, हिना यांना पैसे व सोन्याचे दागिने कपाटात दिसून आले नाहीत. घरातील दरवाजा आणि खिडकीचा कडीकोयंडाही व्यवस्थित असल्याचे दिसून आले. यासंदर्भात हिना यांनी मुलींसह आईला सांगून घरात शोधाशोध केली, तरीही त्यांना ते मिळून न आल्याने अखेर त्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या वेळी हिना यांनी कुलपाची बनावट चावी बनवून कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक माने यांना तपासाचे आदेश दिले. त्यानुसार माने यांनी हिना यांच्याकडून सर्व गोष्टींची माहिती घेतली आणि आपले खबरी कामाला लावले. तसेच तांत्रिकदृष्ट्याचा बारकाईने अभ्यास केला. याचदरम्यान नातेवाइकांची माहिती घेताना सानिया बेग यांचे नातेवाईक त्याच दिवशी मुंब्रा परिसरात असल्याची माहिती मिळली आणि संशयाची सुई सानियावर अडकली. तिची चौकशी सुरू केली असता सुरुवातीला त्यांनी तोंडातून ब्र शब्दही काढला नाही. परंतु सानियाला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
हिना यांच्या घरातून चोरलेले साडेतीन लाखांचे पाच तोळ्यांचे मंगळसूत्र, चार लाख २० हजार रुपयांचे सहा तोळ्यांचे लहान-मोठे दोन सोन्याचे नेकलेस, पावणेदोन लाखांचे अडीच तोळ्याचे कानातील एक जोड, दोन लाख १० हजारांच्या तीन तोळ्यांचा दोन नग बांगड्या, एक लाख पाच हजारांचा दीड तोळ्याचे ब्रेसलेट, चार लाख ५५ हजारांच्या साडेसहा तोळ्याच्या पाच चेन व पेंडल, एक लाख पाच हजारांचा दीड तोळ्याचा लहान हार, ३५ हजारांच्या पाच ग्रॅम वजनाच्या मुलींचा अंगठ्या, पावणेदोन लाखांच्या अडीच तोळ्यांच्या १० अंगठ्या, एक लाख ४७ हजारांच्या २.१ तोळ्यांच्या सहा जेन्ट्स अंगठ्या, एक लाख पाच हजारांचे दीड तोळ्याचे चार जोडी लहान मोठे टॉप्स, ७० हजारांचे एक तोळ्याचे तीन नग लहान मुलांचे कडे, ७० हजारांचे इतर सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा २४ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

मोबाईल लोकेशनने सापडली जाळ्यात
सानियाचे हिना यांच्याकडे येणे-जाणे होते. यामुळे दागिन्यांसह इतर गोष्टी कुठे ठेवल्या जातात याची त्यांना माहिती होती. तेव्हापासून सानिया हिना यांच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष ठेवून होती. सानियाने घराची बनावट चावी बनवून ठेवली होती आणि संधी मिळताच तिने घर साफ केले. सानिया हिने केवळ मौजमजेसाठी चोरी केल्याचे सांगितले. पण तिच्या मोबाईल लोकेशन्सने ती संशयाच्या जाळ्यात ओढली गेली. तिची चोरी उघडकीस आली, अशी माहिती तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक माने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com