ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

Published on

पद्मदुर्ग जलदुर्गाची दयनिय अवस्‍था
संवर्धनाअभावी तटबंदी, मनाऱ्याची पडझड; स्थानिकांमध्ये संताप
मुरूड, ता. ५ (बातमीदार) : मुरूड किनाऱ्यापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात उभारलेला ‘पद्मदुर्ग’ (कासा किल्ला) आज अस्तित्वाच्या संकटात सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये सिद्दींच्या अजिंक्य जंजिऱ्याला शह देण्यासाठी हा भव्य जलदुर्ग उभारला होता. मराठा आरमाराच्या सामर्थ्याची साक्ष देणारा हा ऐतिहासिक किल्ला आज पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे ढासळत चालला आहे.
समुद्राच्या लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदी, मनोरे आणि आतील रचना भग्नावस्थेत गेली आहेत. जंजिऱ्याच्या संवर्धनासाठी दरवर्षी निधी दिला जातो, स्वच्छता मोहिमाही राबवली जाते; मात्र राजे शिवरायांच्या पद्मदुर्गाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. इतिहासदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला असूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी नाराजी ‘मुरुड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्था’चे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर यांनी व्यक्त केली. पद्मदुर्गाचे वास्तुशिल्प, सागरी रणनीतीतील भूमिका आणि शिवकालीन पराक्रमाशी जोडलेली कहाणी यामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमध्ये या किल्ल्याबद्दल विशेष कुतूहल आहे. दरवर्षी ५ ते ६ लाख देश-विदेशातील पर्यटक जंजिऱ्याला भेट देतात, त्यांपैकी काहींचे लक्ष पद्मदुर्गाकडे वळवता आले तर स्थानिक मच्छीमारांना स्थायी रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते, असा विचार स्थानिक पातळीवर मांडला जात आहे.
....................
कृती आराखड्याकडे लक्ष
खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी ८ मार्च २०२५ रोजी पुरातत्त्व विभाग व मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह किल्ल्याची पाहणी केली होती. त्यानंतर काही बैठका झाल्या असल्या तरी ठोस कृती आराखडा अद्याप अस्तित्वात नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. पद्मदुर्ग किल्ल्याचे तातडीने संवर्धन, दुरुस्ती आणि पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करून देत या शिवकालीन वारशाचे जतन व्हावे, अशी मागणी मुरुडवासीयांनी पुरातत्त्व विभाग व जनप्रतिनिधींकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com