आदिवासी भागातील कारागिरांच्या वस्तुंचे डोंबिवलीत प्रदर्शन

आदिवासी भागातील कारागिरांच्या वस्तुंचे डोंबिवलीत प्रदर्शन

Published on

आदिवासी कारागिरांच्या वस्तूंचे डोंबिवलीत प्रदर्शन
बांबू, शेणाच्या वस्तू, जंगली वनस्पतींपासूनची औषधे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः अमरावती, नाशिक, पुणे, तळेगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासीबांधवांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे डोंबिवलीत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये बांबू लाकूड, कपडे, जंगलातील फळे, वनस्पतींची मुळे, फुलांपासून तयार केलेल्या कोरीव वस्तू, औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पूर्वेतील रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनच्या वतीने येथील आदित्य सभागृहात समन्वय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आदिवासी भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुंबरोबर डोंबिवली शहर परिसरातील मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तू या प्रर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. शनिवार व रविवार दोन दिवस हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
अमरावती धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरातील संपूर्ण बांबू केंद्र गटातील कारागीर बांबूपासून गृहपयोगी, घर सजावटीच्या वस्तू घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी कारागीर बांबूपासून तयार केलेले विविध प्रकारचे प्राणी, शिट्टी, घर सजावटीच्या वस्तू भित्ती चित्र घेऊन या प्रदर्शनात सहभागी आहेत. पुणे, तळेगाव बचत गट महिलांनी तयार केलेल्या पिशव्या, पाऊच व बटवे येथे विक्रीसाठी आहेत. विवेकानंद सेवा मंडळाच्या डोंबिवली पूर्वतील नियंत्रणाखाली कसारा विहिगाव भागात महिला बचत गट चालविले जातात. या महिला बचत गटांना अगरबत्ती, मेणबत्ती, दिवाळीतील दिवे, सुंगधित उटणी, शरोणापासून तयार केलेले सुगंधित धूप तयार करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. या वस्तू या प्रदर्शनात दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरेदीची नागरिकांना संधी आहे.
विविध भागातून आलेल्या या कारागिरांची निवास, भोजनाची सोय रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनने केली आहे. कोणतेही शुल्क न आकारता त्यांना सभागृहात वस्तू विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. आदिवासी भागातील लोकांचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कशाळकर आणि सहकारी या उपक्रमात सहभागी आहेत. या उपक्रमामागील मुख्य उदेश असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अंजली जोगळेकर यांनी दिली आहे.

मतिमंद मुलांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू
डोंबिवलीतील क्षितिज मतिमंद शाळेतील मुलांनी तयार केलेल्या आकर्षक भेट वस्तू, शुभेच्छा पत्रे, विविध प्रकारची कागदी फुले प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आरोग्यास पोषक असा ग्रामीण भागातील जुना भात गिरणीत सफाई न केलेला विविध प्रकारचा जुना तांदूळ या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विविध वस्तू, कलाकुसरीच्या सामानाचा वापर करून तयार करण्यात आलेले विविध प्रकारचे आकर्षक दागिने प्रदर्शनात पाहण्यास मिळतात.

ग्रामीण बाजाची प्रभावी औषधे
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव येथील पुणे येथील वनऔषधी आदिवासी संशोधन केद्राखाली काम करणाऱ्या संस्थेने जंगलातील विविध प्रकारच्या वनस्पती, त्यांची मुळे यापासून तयार केलेली ग्रामीण बाजाची प्रभावी औषधे या प्रदर्शनात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com