बोलीभाषांचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी

बोलीभाषांचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी

Published on

कासा, ता. ५ (बातमीदार) ः लेखन आणि वाचन हे माणसाला समृद्ध करणारे घटक आहेत. भाषेच्या तीन हजारांहून अधिक बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. बोलीभाषा टिकवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात संस्कृती आणि भाषा अधिक जिवंत आहेत. बोलीभाषेत बोलण्याबरोबरच लिहिणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांनी केले.

कासा येथील पूज्य आचार्य भिसे विद्यालयात आयोजित अभिजात मराठी भाषादिन कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा गायकवाड यांनी भूषवले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ‘कोमसाप’च्या आंदोलनाचा प्रवास आणि सरकारचा आदेश यांचा आढावा घेऊन प्रवीण दवणे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या भाषेच्या प्रवासाची माहिती देत, दक्षिण भारतातील मातृभाषेला मिळालेल्या स्थानाचा दाखला देऊन मराठीलादेखील तेवढेच स्थान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दवणे यांनी आपल्या ‘निसर्गाची शाळा’ व ‘स्वप्नातले महाभारत’ या स्वलिखित बिडंबन काव्यांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कवितांना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सी. एस. पाटील यांनी केले. साहित्यिक परिचय नितीन बोंबाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. आर. आर. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमराज साळुंखे यांनी मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com