कल्याण अवती-भवती
शिस्त, संघटन, राष्ट्रभक्तीचा आविष्कार
कल्याण (वार्ताहर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्याण जिल्ह्यातील विवेकानंद नगरातर्फे रविवारी (ता. ५) सकाळी आयोजित शताब्दी विजयादशमी पथसंचलन दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या वेळी संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पावलांतून पथसंचलनाद्वारे विविध भागांत राष्ट्रभक्तीची लाट आल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिमेतील सुभाष नगर - वाडेघर मार्गावरील विवेकानंद नगरातील शशांक शाळेपासून या पथसंचलनाला सुरुवात झाली. तिथून पुढे लालचौकी येथील शिंदे मळा, एम के हायस्कूल मार्ग, संत गजानन महाराज नगर, बेतुरकर पाडा, सहजानंद चौक, जैन सोसायटीमार्गे संतोषी माता रोड परिसरातील नवजीवन शाळेच्या मैदानात या संचलनाचा समारोप केला. नेहमीप्रमाणेच अतिशय नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे पथसंचलन केले. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या पथसंचलनाच्या माध्यमातून संघाच्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करण्यात आला, तर हे पथसंचलन जाणाऱ्या मार्गावरील शिंदे मळा बैठक, गजानन महाराज मंदिर, इस्कॉन कल्याण, सुंदर नगरसह विविध संस्था आणि सोसायटींकडून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. संघाचा भाग होणे हे केवळ सन्मानाचे नव्हे तर राष्ट्रचेतना जागवणारे अनुभव आहे. “आपल्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे. संघटन, राष्ट्रभक्ती आणि शिस्त ही संघाची खरी ताकद आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी सहभागी झालेल्या संघस्वयंसेवकांकडून व्यक्त करण्यात आली.
.......................
उंबरली गावातून नऊ फूट लांबीच्या अजगराची सुटका
कल्याण (वार्ताहर) : डोंबिवली पूर्वतील उंबरली, मानपाडा रोड येथील हितेश पाटील यांच्या घरात शुक्रवारी (ता. ३) रात्री तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर शिरला होता, याची माहिती त्यांनी तत्काळ सेवा ट्रस्टला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सेवा ट्रस्टचे कार्यकर्ते व सर्पमित्र पूर्वेश कोरी, सुभाष पंडियन आणि ओजस ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक व कौशल्यपूर्ण पद्धतीने त्या अजगराची सुटका केली. सेवा ट्रस्टच्या अध्यक्षांनी तत्काळ कल्याण वन विभागाचे राजू शिंदे यांना माहिती दिली तसेच विभागाचे संजय साबळे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या मोठ्या अजगराला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले. सेवा ट्रस्टच्या पथकाने पुन्हा एकदा मानव आणि सर्प यांच्यातील समतोल राखण्यासाठी केलेल्या या तातडीच्या आणि संवेदनशील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.....................
१०० विद्यार्थ्यांना स्टडी ॲपचे मोफत वाटप
डोंबिवली (बातमीदार) : मानिवली येथील स्थापत्य अभियंता भूषण पाटील आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली फिनिक्स यांच्या पुढाकारातून न्यू इंग्लिश स्कूल, सोनाळे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना १०० प्रत्येकी १८०० रुपये किमतीचे स्टडी ॲप मोफत देण्यात आले. माजी अध्यक्ष संतोष पाटील यांनी ॲपचा वापर कसा करावा, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या वेळी भूषण पाटील, सचिव राजेश जंगम, मुख्याध्यापक गोरखनाथ सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. सोळुंके सरांनी भूषण पाटील यांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली. रोटरी क्लबने भविष्यात शाळेला शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या क्रीडा कामगिरीचेही या वेळी कौतुक करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.