भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरुस्तीचा वाद
भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरुस्तीचा वाद
कंत्राटावरून आरोप-प्रत्यारोप
भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १५० कोटी रुपये खर्च केले असूनही या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. या गंभीर बाबीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून, ठेकेदार आणि संबंधित सरकारी विभागावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी आणि भिवंडी जनआंदोलन समिती यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवार यांनी या रस्त्याच्या दुरुस्ती कामाविरोधात चार दिवसांचे बेमुदत उपोषण केले आहे. त्यांनी या रस्त्यावरील कामाचा निकृष्ट दर्जा आणि अनियमिततेवर गंभीर आरोप केले. खासकरून त्यांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागावर काम दर्जेदार न केल्याचा आरोप करीत या कंपनीवर विधान परिषदेत ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय झाला आहे; तरीही त्या कंपनीला रस्त्यावरील कामे दिली जात असल्याचा आरोप उपस्थित केला आहे. त्यांचा असा दावा आहे, की जिजाऊ कंपनीने खड्डे भरण्याच्या नावाखाली सरकारचा आणि लोकांचा विश्वास फसवला आहे.
दुसरीकडे जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक नीलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत यावर पूर्णपणे विरुद्ध बाजू मांडली. त्यांनी सांगितले, की २०१८ पासून माझा जिजाऊ कन्स्ट्रक्शनशी कोणताही व्यवहार नाही. माझे सामाजिक आणि व्यवसायाचे काम वेगळे आहेत. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. तसेच मिळालेल्या नफ्यातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहोत. त्यांनी आंदोलनकर्त्यांवरही आरोप केले, की अमराठी ठेकेदारांवरून दडपण टाकून आम्हाला बदनाम करण्याचा कट आहे. त्यांनी नमूद केले, की जिजाऊ कन्स्ट्रक्शनने या रस्त्यावर एकूण एक कोटी रुपयांचे काम केले असून, त्याच्याव्यतिरिक्त अंबाडी ते वाडादरम्यान सॉइल स्टॅबिलायझेशनचे काम केले आहे, जे दोन वर्षे सुस्थितीत राहिले. काही भागांतील दुरुस्तीचे कामदेखील त्यांनी केले आहे, जे अजूनही उत्तम स्थितीत आहे.
सांबरे यांनी म्हटले, की सध्या या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराकडे आहे आणि त्याच्याकडे ५५ कोटी रुपयांचे काम आहे. तसेच त्यांनी नमूद केले, की ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अमराठी ठेकेदारांवर कोणतीही तक्रार किंवा आरोप होत नाही, पण स्थानिक मराठी ठेकेदारांना दडपणाखाली आणून ब्लॅकमेलिंग केले जात आहे.
कारवाईची मागणी
पवार यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत म्हटले आहे, की ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने या कामासाठी बोगस बिल तयार करून १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आम्हाला माहिती मिळताच ती सार्वजनिक केली. नीलेश सांबरे यांनी ईगल इन्फ्रास्ट्रक्चरकडून काम घेण्यासाठी डील सुरू केली होती. त्यामुळे ते खरे ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी सांबरे यांच्याविरुद्ध शासकीय योजनेशिवाय रुग्णालय चालविण्याचा आरोपही केला. दोघांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी-वाडा रस्त्याची दुर्दशा, भ्रष्टाचार आणि प्रशासनाची उदासीनता उघड झाली आहे. स्थानिकांनीही या प्रकरणात स्थानिक आमदारांकडून पाठिंबा न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. जनआंदोलन समितीने ठाणे आणि पालघर जिल्हा प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.