फाटक्या नोटेवरून तिकीट नाकारलेले प्रकरण चिघळणार
बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : फाटकी नोट दिल्यावरून बदलापूर रेल्वे स्थानकात एका महिला तिकीट निरीक्षकाने प्रवाशांना तिकीट नाकारल्याच्या घटनेवरून मोठा गदारोळ झाला होता. ‘सकाळ’ वृत्तपत्रातून ही बातमी प्रसिद्ध होताच, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने याची त्वरित दखल घेतली आहे. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये; तसेच संबंधित उद्धट महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन महासंघाने स्टेशन प्रबंधकांना सादर केले आहे.
बदलापूर स्थानकात किशोरी आरडे या महिलेने तिकीट काढले असता, रेल्वेकडून त्यांना परताव्यामध्ये ५० रुपयांची फाटकी नोट मिळाली. महिलेने ही नोट घेण्यास नकार दिला असता, संबंधित तिकीट निरीक्षकेने, आम्ही नोटा घरी बनवत नाही, असे उद्धट उत्तर दिले. वाद नको म्हणून आरडे यांनी ती नोट घेतली. मात्र, रांगेत उभ्या असलेल्या सुधाकर सिंग नावाच्या पुरुष प्रवाशाने त्यांची फाटकी नोट बदलून दिली. यानंतर सिंग यांनी ती फाटकी नोट स्वतःचे तिकीट काढण्यासाठी निरीक्षकाकडे दिली. आश्चर्य म्हणजे, यावेळी त्या निरीक्षिकेने सिंग यांना चक्क तिकीटच नाकारले. यामुळे स्थानकात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. वाद वाढत असल्याचे पाहून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले. अखेरीस वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर संबंधित निरीक्षिकेची चूक लक्षात आली आणि तिने प्रवाशांची माफी मागितली.
ही बातमी सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली. तिकीट नाकारणाऱ्या उर्मट रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित महिला तिकिट निरीक्षिकेवर कारवाई, तसेच भविष्यात असा प्रकार बदलापूर स्थानकात घडू नये या संदर्भातील निवेदन बदलापूर स्टेशन प्रबंधकांना सादर केले.
बदलापूर स्थानकात घडलेला प्रकार अतिशय चुकीचा होता. प्रवाशांसोबत तिकीट निरीक्षकाचे वागणे चुकीचे होते. याबाबत रेल्वे प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास या महिला कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. यासाठी महासंघाच्या वतीने स्टेशन प्रबंधक बदलापूर यांना निवेदन सादर केले आहे.
- अभिजित धुरत, अध्यक्ष
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ