निष्पाप मुलींच्या मृत्यूचा रोष
निष्पाप मुलींच्या मृत्यूवरून रोष
शास्त्रीनगर रुग्णालयात ठिय्या आंदोलन; डोंबिवलीकरांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सर्पदंश झालेल्या साडेचारवर्षीय प्राणवी विकी भोईर आणि २४ वर्षीय कुमारी श्रुती अनिल ठाकूर या मावशी व भाचीचा योग्य उपचारांअभावी मृत्यू झाला. या घटनेला सर्वस्वी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत मंगळवारी (ता. ७) सकाळी समस्त डोंबिवलीकरांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला.
मृत कुटुंबीयांच्या परिवारासह सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी द्वारका हॉटेल ते शास्त्रीनगर रुग्णालय असा विराट निषेध मोर्चा काढला. आंदोलकांनी रस्त्यावर ‘भीक मांगो’ आंदोलन करून जमा झालेले पैसे पालिकेत जमा करणार असल्याचे सांगितले. ‘भीक द्या, भीक द्या, महापालिका आयुक्तांना भीक द्या’ ‘आरोग्य प्रशासन हाय हाय’ ‘नको दांडिया, नको गरबा, आम्हाला हवी आरोग्यसेवा’ अशी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलकांनी स्पष्ट भूमिका घेतली की, जोपर्यंत महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त स्वतः येऊन भेटत नाहीत, तोपर्यंत आम्ही रुग्णालय परिसरातून हटणार नाही. सुमारे दोन तास सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि मृत कुटुंबीय रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडून बसले होते.
डॉ. संजय जाधव यांचे केलेले निलंबन तत्काळ मागे घ्यावे. तसेच या घटनेला जबाबदार असलेले डॉ. योगेश चौधरी आणि डॉ. दीपा शुक्ल (सीएमओ) यांना तत्काळ निलंबित करावे आणि प्रशासकीय अहवाल येईपर्यंत त्यांची दुसरीकडे बदली करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर निपक्षपणे कारवाई करून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ‘‘सेलिब्रिटींना द्यायला पैसे आहेत, दांडिया भरवायला पैसे आहेत, कमानी उभारायला पैसे आहेत, पण रुग्णालयात सोयीसुविधा द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, अशी टीकाही करण्यात आली. तसेच प्रशासनाने १५ दिवसांच्या आत या मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास, संपूर्ण जनता पुन्हा एकदा विराट मोर्चा घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेवर धडकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.
आरोग्य व्यवस्थेतील गैरप्रकार
रुग्णालयात डॉक्टर महागडे उपचार करून बाहेरच्या मेडिकलमधून औषधे आणण्यास भाग पाडतात, व्हेंटिलेटर मशीन बंद आहेत. हजेरी रजिस्टरवर आरएमओ डॉक्टर आठ दिवसांआधीच सह्या करतात, असे अनेक गैरप्रकार मोर्चेकऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांसमोर मांडले.
रुग्णवाहिकेला टाळे ठोका
रुग्णालयात असलेल्या तीन रुग्णवाहिकेकेमध्ये ऑक्सिजन चालू नसल्याने, मोर्चेकऱ्यांनी रुग्णवाहिकेला टाळे ठोका किंवा तातडीने रुग्णवाहिकेचा रेट कार्ड दर्शनी भागात लावा, असा रोष व्यक्त केला.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
आंदोलकांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांची निपक्ष चौकशी करून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि मास्टर रजिस्टर तपासून कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनातील महत्त्वाच्या मागण्या
शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांचे आयसीयू विभाग १०० टक्के अद्ययावत व सुसज्ज बनवावेत.
वैद्यकीय विभागाच्या पर्यवेक्षणासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी.
गर्भवती महिलांच्या उपचारादरम्यान होणारे मृत्यू रोखण्यासाठी कृती योजना तयार करावी.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन
महापालिका आयुक्त आंदोलनाकडे दुर्लक्ष करत शासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्याने मोर्चेकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला आणि लेखी आश्वासन दिले. या आश्वासनात त्यांनी नमूद केले: ‘‘सदर दोन्ही रुग्णांच्या दुःखद निधनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाची सीसीटीव्ही, उपचार रजिस्टर व संबंधितांचे जबाब घेऊन निपक्ष सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, सदर घटनेमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.