विराथन खुर्द येथील उत्खननाविरोधात बेमुदत उपोषण

विराथन खुर्द येथील उत्खननाविरोधात बेमुदत उपोषण

Published on

मनोर, ता. ७ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील विराथन खुर्द गावात गुरुचरण जमिनींवर गौणखनिज उत्खनन आणि सुरुंग स्फोट केले जात आहेत. सध्या हा प्रकार विनापरवानगी सुरू असून, स्थानिकांना त्रास होत आहे. हे उत्खनन तातडीने थांबवावे, अशी मागणी करत मनसेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार (ता. ७)पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

विराथन खुर्द गावातील जमिनीवर एका खासगी कंपनीतर्फे उत्खनन करून सरकारचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा मनसेचे उपजिल्हा संघटक मंगेश घरत यांनी केला आहे. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी हे उत्खनन केले जात आहे. कंपनीने गुरुचरण जागेत परवानगीशिवाय स्फोटक वापरून उत्खनन केल्याचे घरत यांचे म्हणणे आहे. गुरुचरण जमिनी कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उपयोगासाठी परवानगी देण्याची तरतूद नसताना खोट्या तलाव खोदकाम परवानगीच्या आधारे गाळ काढण्याच्या नावाखाली उत्खनन केले जात आहे. याप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे उपोषणाला बसण्याची वेळी आली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही आणि प्रशासनाकडून मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असा इशारा घरत यांनी दिला आहे.

कायद्यानुसार प्रक्रिया!
पाण्याच्या समस्या असल्याने गावकऱ्यांच्या मागणीनुसार तलाव खनन करण्याची परवानगी घेण्यात आली आहे. त्यानुसार सरकारने एक लाख ब्रासची रॉयल्टी घेतली होती. तलावातील मुरूम राष्ट्रीय प्रकल्पासाठी वापरला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आणि काम कायदेशीर योग्य आहे, असे पालघर जिल्हा खनीकर्म अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com