रस्त्याचे काम सुरू न झाल्यास रास्ता रोको

रस्त्याचे काम सुरू न झाल्यास रास्ता रोको

Published on

डहाणू–चिंचणी रस्त्याची दुर्दशा
आठवडाभरात काम सुरू न केल्यास रास्ता रोकोचा इशारा
तारापुर, ता. ८ (बातमीदार) : डहाणू खाडी ते चिंचणी हा मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी पोखरून निघाला असून, प्रवाशांच्या हालअपेष्टांना अंतच राहिलेला नाही. मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि पावसाचे साचलेले पाणी यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. गरोदर महिला, शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे अपघातग्रस्त झाले असून, नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या वाढत्या समस्येला वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर प्रशासनाचा दरवाजा ठोठावला आहे. बाडापोखरण परिसरातील नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळाने पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपअभियंता चव्हाण यांची भेट घेऊन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की डहाणू खाडी ब्रिज परिसर, तडीयाळे केवलेश्वर मंदिराजवळील रस्ता, गुंगावाडा नाका–बहाड मार्ग, बहाड सरकारी दवाखाना ते राऊत स्टॉप, सरकारी आंबा ते नवतलाव रोड, मनभाट ते वरोर (चुरीवाडीपर्यंत), चिंचणी पाटीलवाडा (कोंडवाडा स्टॉप) आणि भंडार आळी या सर्व ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरू असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, डहाणू–चिंचणी हा रस्ता या परिसरातील जीवनवाहिनी मानला जातो. दररोज हजारो नागरिक या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गंभीर फटका बसत आहे. नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न केल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवेदनावेळी समाजसेवक विनीत पाटील, ॲड. राकेश मडवे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, योगेश पाटील तसेच बाडापोखरण येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डांबरीकरणाची मागणी
ग्रामस्थांनी प्रशासनास ठाम इशारा दिला आहे, की १५ ऑक्टोबरपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण आणि आवश्यक उपाययोजना न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल. पुढील दोन दिवसांत अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल आणि रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू केले जाईल. नागरिकांचे मत विचारात घेऊन नियोजन करण्यात येईल, असेही आश्वासन उपअभियंता चव्हाण यांनी नागरिकांना दिले.

कोट -
डहाणू खाडी ते चिंचणी रस्ता हा आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. १५ ऑक्टोबरपूर्वी काम सुरू न झाल्यास आम्ही रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
- ॲड. राकेश मडवे, ग्रामस्थ, वाडापोखरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com