ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना अतिक्रमण विभाग  सोडवेना

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना अतिक्रमण विभाग सोडवेना

Published on

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना अतिक्रमण विभाग सोडवेना
१७० कर्मचाऱ्यांच्या बदलीस टाळाटाळ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर पालिका आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील केली आहे. असे असताना आता अतिक्रमण विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या १७० कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. २०२१ मध्ये बदलीच्या आदेशानंतरही अवघ्या महिनाभरातच कर्मचारी पुन्हा त्याच विभागात दाखल झाले. त्यामुळे यावर पालिका आयुक्त कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ठाणे पालिकेच्या वर्धापनदिनीच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाखांची लाच घेताना पकडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यातून राज्यातील आघाडीचे शहर व महापालिकांमध्ये ठाणे शहराचा नावलौकिक होत असतानाच, पाटोळेंमुळे प्रतिष्ठेला काळिमा फासला गेला, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, अशी खंत भाजप ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षाच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता आहे. महापालिकेत अतिक्रमण विभागाप्रमाणेच शहर विकास, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या पदांवरही काही अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. त्यांच्याही बदल्या करण्याची गरज आहे, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी अतिक्रमण विभागातून १७० कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली होती, परंतु अवघ्या महिनाभरापेक्षा कमी काळात संबंधित १७० कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाले. या प्रकाराची आपण चौकशी करावी आणि सध्या ते १७० कर्मचारी कुठे काम करीत आहेत, याची माहिती घ्यावी, या कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांची अन्य विभागात बदली करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

बढती मिळाल्यानंतरही मलिद्याच्या विभागातच कायम
ठाणे महापालिकेने २१ जुलै रोजी कार्यालयीन अधीक्षक व वरिष्ठ लिपिकपदावर अनेक कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली, परंतु अतिक्रमण विभाग, शहर विकास विभाग, घनकचरा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी बढती मिळूनही पूर्वीच्याच पदावर कायम आहेत. या कर्मचाऱ्यांना तत्काळ विभागातून मुक्त करावे, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com